नागपूर : भारतीय हवाई दलातील फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांचे सुखोई लढाऊ विमान कोसळल्याच्या दुर्घटनेत निधन झाल्यानंतर आज, शनिवारी त्यांचे पार्थिव नागपुरातील नवीन सुभेदार ले-आऊट येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. पार्थिव घरी पोहोचताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.
कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या घरासमोर जमा झाले होते. आपल्या परिसरातील वीरपुत्राला अखेरचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.भारतीय हवाई दलाच्या जवानांनी अत्यंत सन्मानाने त्यांचे पार्थिव घरी आणले. तिरंग्यात लपेटलेल्या पार्थिवाचे दर्शन होताच उपस्थितांचे डोळे पाणावले.
तरुण आणि एकुलता एक मुलगा गमावल्याने त्यांच्या आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पार्थिव पाहताच आई-वडिलांचा बांध फुटला आणि त्यांच्या अश्रूंनी उपस्थितांनाही गहिवरून आले. आपल्या मुलाला अखेरचा निरोप देताना कुटुंबीयांसह अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले होते.परिसरातील नागरिकांनीही अत्यंत भावनिक वातावरणात पूर्वेश यांना श्रद्धांजली अर्पण केली.
देशसेवेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या या तरुण वैमानिकाबद्दल परिसरात अभिमानासह दुःखाची भावना व्यक्त होत होती. अनेकांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी घराकडे धाव घेतली.केवळ २८ वर्षांचा असलेला पूर्वेश दुरगकर अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे.
त्याची बहीण अमेरिकेत वास्तव्यास असून भावाच्या निधनाची बातमी समजताच ती तातडीने नागपुरात दाखल झाली. पूर्वेश यांच्या आकस्मिक निधनामुळे नागपूर शहरात हळहळ व्यक्त होत असून देशसेवेत प्राणार्पण करणाऱ्या या धाडसी वैमानिकाला नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
दरम्यान, आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात बुधवारी रात्री भारतीय हवाई दलाचे सुखोई एसयू-३० लढाऊ विमान कोसळल्याने ही दुर्घटना घडली. पूर्वेश दुरागकर यांची आसाममधील तेजपूर एअरबेसवर नियुक्ती होती. मात्र तेजपूर येथील धावपट्टीवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ते सध्या तात्पुरते जोरहाट येथे तैनात होते. याच काळात ही दुर्घटना घडली.
पूर्वेश दुरगकर यांचे पार्थिव शनिवारी दुपारी नागपूरमध्ये आणण्यात आले. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रशासन तसेच हवाई दलाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागपूरकरांसह विविध स्तरांतून दुरागकर कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करण्यात येत आहे.
आसाममधील उड्डाणादरम्यान झालेल्या सुखोई लढाऊ विमान अपघातात प्राण गमावलेले नागपूरचे वैमानिक फ्लाइट लेफ्टनंट पुरवेश दुरगकर (२७) यांची आठवण त्यांच्या शाळेत आजही जिवंत आहे. “आमच्या शाळेच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये त्याचा फोटो अजूनही आहे,” असे सांगताना शिक्षक भावूक झाले.ओंकारनगर येथील द साउथ पब्लिक स्कूल या शाळेचे २०१५ सालचे माजी विद्यार्थी असलेले दुरगकर शांत, मितभाषी पण अत्यंत प्रामाणिक विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. भारतीय हवाई दलमध्ये दाखल झाल्यानंतरही त्यांनी शाळेशी नाते कायम ठेवले होते.
