नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी १ एप्रिल रोजी ‘फुल कोर्ट मीटिंग’मध्ये प्रत्येकाची संपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी ५ मे रोजी रात्री सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर न्यायालयातील सर्व न्यायमूर्तींची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यात देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील ३३ पैकी २१ न्यायमूर्तींच्या संपत्तीची यादी देण्यात आली आहे. न्यायमूर्तींच्या नावे किती रक्कम व मालमत्ता आहेत तसेच त्यांच्या बँक खात्यात किती रक्कम आहे आणि त्यांनी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे, याबाबतही सविस्तरपणे माहिती दिली गेली आहे.
२७० कोटींची गुंतवणूक व १२ किलो सोना
सर्वोच्च न्यायालयातील ३३ पैकी २१ न्यायमूर्तींनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. या सर्व न्यायमूर्तींची एकत्रितरित्या विविध आर्थिक क्षेत्रात २७० कोटींची गुंतवणूक आहे. सर्व न्यायमूर्तींकडे एकूण १२ किलो सोना आहे. सर्वाधिक न्यायमूर्तींनी फिक्स्ड डिपॉझिट म्हणून बचत केली असल्याची माहिती दिली. न्यायमूर्तींच्या एकूण संपत्तीपैकी सुमारे ८० टक्के रक्कम फिक्स्ड डिपॉझिटसारख्या पारंपारिक गुंतवणूक क्षेत्रातील आहे. वीस न्यायमूर्तींची एकत्रितरित्या फिक्स्ड डिपॉझिट ही २२३ कोटी रुपये आहे. न्यायमूर्तींनी ४७ कोटी रुपये प्रॉविडन्ट फंडमध्ये गुंतवली आहे.
एकूण रक्कमेच्या ही १७ टक्के आहे. न्यायमूर्तींकडे असलेल्या एकूण सोन्यापैकी बहुतांश सोना स्त्री धन असल्याचे सांगण्यात आले. पाच न्यायमूर्तींकडे पाच पेक्षा अधिक घर आहे. नऊ न्यायमूर्तींकडे ४-५ घरे आहेत. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानावे बँकेत ५५ लाख ७५ हजार रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिट आणि १ कोटी ६ लाख रुपयांचा पीपीएफ आहे. भावी सरन्यायाधीशा भूषण गवईंच्या नावे बँकेत १९ लाख ६३ हजारांच्या ठेवी तर पीपीएफ खात्यात ६ लाख ५९ हजार रुपये आहेत. न्यायमूर्ती ए. एस. ओक यांच्या नावे ९२ लाख ३५ हजार पीपीएफ, २१ लाख ७६ हजार एफडी तर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एफडीमध्ये ६ कोटी ३ लाख रुपये आहेत. न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्या नावे म्युच्युअल फंडमध्ये ६० लाख रुपये, पीपीएफमध्ये २० लाख रुपये आहेत.
हे आहेत सर्वात श्रीमंत न्यायमूर्ती
संपत्ती जाहीर केलेल्या २१ न्यायमूर्तींपैकी निम्मी संपत्ती एकट्या न्या.के.व्ही.विश्वनाथन यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे सुमारे १३७ कोटींची संपत्ती आहे. त्यांनी २०११-१२ ते २०२४-२५ या आर्थिक वर्षात ९१.४७ कोटींचा कर भरला. यंदाच्या आर्थिक वर्षात त्यांनी ६.७ कोटीचा कर भरला आहे. न्या.विश्वनाथन यांनी त्यांच्या १३७ कोटी संपत्तीचे वर्गीकरण सादर केलेले नाही. जाहीर झालेल्या यादीपैकी तीन न्यायमूर्तींकडे २५ कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. तीन न्यायमूर्तींची संपत्ती ५ ते २५ कोटी दरम्यान आहे तर आठ न्यायमूर्तींची संपत्ती एक ते पाच कोटींच्या मध्ये आहे. चार न्यायमूर्तींची संपत्ती ५० लाखांपेक्षा कमी आहे.