नागपूरमध्ये ‘स्वाईन फ्लू’चा विळखा घट्ट होत असून गेल्या तीन दिवसांत तब्बल २५ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे उपराजधानीतील विविध रुग्णालयांत आढळलेल्या स्वाईन फ्लूग्रस्तांची संख्या आता थेट ५७ रुग्णांवर पोहचली आहे.

नवीन आढळलेल्या २५ रुग्णांपैकी १२ रुग्ण हे नागपुरातील आहेत. इतर १३ रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यामुळे नागपूर शहरातील आजपर्यंत आढळलेल्या स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या आता थेट ३९ रुग्णांवर पोहचली आहे. नागपूर बाहेरील रुग्णसंख्या आता १८ रुग्णांवर पोहचली आहे. रुग्णवाढीचे प्रमाण वाढत चालल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. हा विषाणू झपाट्याने पसरत असल्याचे बघत वैद्यकीय क्षेत्रातही चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, रुग्णांची वाढती संख्या बघता आता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वाईन फ्लू संशयितांचे नमुने मोठ्या संख्येने विविध शासकीय प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सोबत हा आजार आढळणाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तींपर्यंत पोहचण्यासह सर्वसामान्यांत या आजाराच्या जनजागृतीवरही भर दिला जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.