नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या छायेत अडकलेल्या ६३२ शिक्षकांच्या वेदना आता उघडपणे समोर येऊ लागल्या आहेत. शिक्षण देणारा हात आज कुटुंबीयांच्या उपजीविकेसाठी धडपडतो आहे. १४ महिन्यांपासून वेतन थांबल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या एका शिक्षकाचा अपघात झाल्याने संपूर्ण यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील अनिल श्रीराम राठोड हे २०१३ पासून नागपूरमधील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मार्च २०२५ पासून त्यांचे वेतन थांबले आणि घरातील संसाराचा गाडा रुळावरून घसरला. फूड डिलिव्हरी करताना अपघात झाल्याने अनिल राठोड हे रुग्णालयात उपचार घेत आहे. पत्नी, दोन लहान मुले आणि वृद्ध आई-वडील यांचा आधार असलेला हा शिक्षक दिवसभर शाळेत कर्तव्य बजावून सायंकाळी ऑनलाइन फूड डिलिव्हरी करीत होता. पण, नियतीने इथेही घात केला.

तरीही शासन कठोरच

या अन्यायाविरोधात ४७२ शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. १० ऑक्टोबर २०२५ रोजीच्या अंतरिम आदेशानुसार शासनाने सात महिन्यांचे वेतन बिल मागविले, मात्र वेतन दिले नाही. अखेर २२ एप्रिल २०२६ रोजी न्यायालयाने अंतिम आदेश देत या शिक्षकांचे तत्काळ वेतन करण्याचे निर्देश दिले. पण, या आदेशानंतरही शासनाच्या हालचाली मंदच आहेत.

कसा झाला अपघात

डिलिव्हरी करताना त्यांचा अपघात झाला. खांद्याचे हाड सरकल्याने शस्त्रक्रिया करावी लागली आणि गेल्या तीन दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही केवळ एका शिक्षकाची व्यथा नाही, तर अशा शेकडो शिक्षकांच्या कुटुंबांची वेदनादायक वस्तुस्थिती आहे. वेतन बंद असलेल्या ६३२ शिक्षकांपैकी सुमारे निम्मे शिक्षक आज पार्ट-टाईम काम करत आहे. कोणी ओला-उबेर चालवितो, कोणी स्विगी-झोमॅटोमध्ये डिलिव्हरी करतो, तर कोणी पेट्रोल पंपावर काम करीत आहे. तरीही दिवसा शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची जबाबदारी तेवढ्याच प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. एवढेच नव्हे, तर जनगणना आणि एसआयआरची कामाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

कोणतीही पूर्वसूचना न देता शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले. आज परिस्थिती अशी आहे की, ज्ञान देणारा शिक्षकच आपल्या कुटुंबाच्या दोन वेळच्या अन्नासाठी झगडतो आहे. शिक्षकांवर उपासमारीची वेळ येणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. न्यायालयाने शिक्षकांच्या बाजून निर्णय दिला आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ वेतन देऊन आम्हाला दिलासा द्यावा. – तन्मय जाधव, उपाध्यक्ष, विदर्भ खासगी प्राथमिक शिक्षक संघ