नागपूर : “पाप करताना मनाला थोडीशी बोच आणि देवाचा धाक नक्कीच असतो,” असं म्हणतात. नागपुरात मात्र एका चोराचा असा अजब आणि विचित्र प्रकार समोर आला आहे, जो पाहून पोलीस आणि नागरिक दोघेही अवाक झाले आहेत. संस्कारीपणा दाखवत चोराने चोरी करण्यापूर्वी आधी देवासमोर हात जोडले, कान धरून चक्क माफी मागितली… उठाबशा काढल्या… आणि त्यानंतर अत्यंत आरामात मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास केली! हा सगळा ‘भक्ती आणि गुन्हेगारी’चा अनोखा मेळ मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या या घटनेची नागपुरात जोरदार चर्चा रंगली आहे.
काय आहे रंजक अन् धक्कादायक घटना?
ही थरारक घटना घडली आहे नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का परिसरातील. शीतला माता मंदिरात हा प्रकार घडला. नेहमीप्रमाणे २७ जुलैच्या रात्री मंदिराचे पुजारी आणि व्यवस्थापक जितेंद्र पांडे मंदिर व्यवस्थित बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते मंदिरात आले, तेव्हा त्यांना मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले दिसले. मनात शंकेची पाल चुकचुकली म्हणून त्यांनी आत जाऊन पाहिले, तर मंदिरातील दोन्ही दानपेट्यांची कुलपे उघडी असल्याचे दिसले. त्यातील भाविकांनी श्रद्धेने दिलेली संपूर्ण रोकड गायब झाली होती!
सीसीटीव्ही फुटेज पाहताच पुजारी अन् पोलीस चक्रावले!
घडलेल्या प्रकारानंतर तातडीने मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात दोन अज्ञात तरुण मंदिरात चोरट्या पावलांनी प्रवेश करताना दिसले. पण त्यातील एका चोराने जे काही केले, ते पाहून सर्वांचेच डोळे पांढरे झाले. दानपेटीला हात लावण्यापूर्वी चोराने अत्यंत नम्रपणे शीतला मातेच्या मूर्तीसमोर हात जोडले. जणू काही तो देवाला सांगत होता *”देवा, मला माफ कर, माझी अडचण आहे म्हणून चोरी करतोय!… त्याने चक्क स्वतःचे कान पकडून देवाची क्षमा मागितली. उठाबशा काढल्या. देवाचा हा ‘आदर’ करून झाल्यावर मात्र चोराने साथीदाराच्या मदतीने क्षणाचाही विलंब न लावता दोन्ही दानपेट्या फोडून सर्व रोकड खिशात कोंबली अन् पोबारा केला.
पोलीस मागावर!
पाप करतानाही देवाची भीती बाळगणाऱ्या या ‘संस्कारी’ चोरांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा दाखल केला. “देवाने तर कदाचित त्याला माफ केले असेल, पण कायदा सोडणार नाही!” या भूमिकेतून पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोन्ही भामट्यांचा शोध घेत आहेत. लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
