नागपूर: नागपूरजवळील धामना गावातील चामुंडी या दारूगोळा कंपनीत गुरुवारी स्फोट होऊन सहा कामगारांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले होते. या कंपनीचे मालक जय शिवशंकर खेमका आणि व्यवस्थापक सागर देशमुख यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कंपनीत फटाक्याच्या वाती तयार केल्या जातात. येथे गुरुवारी जवळपास शंभरावर मजूर कामाला होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाला. यात पाच महिलांसह सहा जणांचा भाजून मृत्यू झाला. तर तिघांवर नागपुरातील रवीनगरच्या दंदे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दगावलेल्यांमध्ये प्रांजली मोदरे (२२, धामणा), प्राची फलके (२०), वैशाली क्षीरसागर (२०), शीतल चटप (३०) मोनाली अलोने (२७) आणि पन्नालाल बंदेवार (५०, सातनवरी) यांचा समावेश आहे. अत्यवस्थ असलेल्या श्रद्धा पाटील, प्रमोद चव्हारे आणि दानसा म्हरसकोल्हे या रुग्णांवर सध्या दंदे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दगावलेले बहुतांश कामगार धामणा, नेरी आणि सातनवरी परिसरातील आहेत. सदर कंपनीत स्फोट झाल्यावर कंपनीचे प्रवेशद्वार बंद असल्याने गावकऱ्यांनी प्रथम प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते उघडण्यात आले. नागरिकांनी जखमींना बाहेर काढले. मात्र, कंपनीतील सर्व अधिकारी पळून गेले. गावकऱ्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना फोन करून माहिती दिली होती. अखेर अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी कंपनीच्या संचालक आणि व्यवस्थापकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी कंपनीचे मालक शिवशंकर खेमका यांना अटक करण्यात आली. त्यांना आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा – नवीन शैक्षणिक वर्षात शाळांना कुठल्या सुट्ट्या राहणार माहिती आहे का? आताच बघा व सुट्ट्यांचे नियोजन करा

महामार्गावर जमाव, तणाव

घटनेच्या दुसऱ्याही दिवशी धामणा परिसरातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने जमाव जमला होता. त्यांच्याकडून कंपनीसह प्रशासनाच्या विरोधातही निदर्शने केली जात होती. मृत्यू झालेल्यांना कंपनीसह शासनाकडून तातडीने मदत न मिळाल्यास आंदोलनाचाही इशारा जमावाकडून दिला गेला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

हेही वाचा – वर्धा : पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; दोन महिन्यानंतर…

मागच्या वर्षी बाजारगावच्या स्फोटातही ९ जणांचा मृत्यू

नागपूर-अमरावती मार्गावरील बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीमध्ये मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अशाच प्रकारची घटना घडली होती. यात ९ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. घटनेदरम्यान नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने या घटनेचे राजकीय पडसाद देखील उमटले होते. सोलारमध्ये भारतीय लष्करासाठी दारूगोळा निर्मितीचे कार्य केले जात होते. अप्रशिक्षित कामगारांना कामावर ठेवल्याने ही घटना घडल्याचा आरोप होता. ‘पेसो’ ने घटनेच्या तब्बल अडीच महिन्यानंतर अहवाल सादर केला. मात्र हा अहवाल कधीच सार्वजनिक करण्यात आला नसल्याने घटनेमागील कारणे आणि दोषी पुढे येऊ शकले नाहीत.