नागपूर : साहेब.. वाघ बिबट्याचा बंदोबस्त करा.. ते जमणार नसेल तर आमची व्यवस्था करा. आज पाच बकऱ्या खाल्ल्या, उद्या आणखी काही. सांगा साहेब..? आम्ही कसे जगायचे..? व्याघ्रप्रकल्पालगतच्या प्रत्येक गावाची हीच कथा आहे. बोर व्याघ्रप्रकल्पालगतच्या गावांमध्ये सध्या वाघ आणि बिबट्यांच्या वावराने गावकरी भयभीत झाले आहेत. म्हणूनच त्यांनी वनमंत्र्यांसह सर्व आमदार, खासदारांना वन्यप्राण्यांपासून बचावासाठी साकडे घातले. याच गावकऱ्यांनी त्यांच्याकडे पुनर्वसनाची सुद्धा मागणी केली आहे.

गुरुवारच्या पहाटे अंदाजे तीन वाजताच्या सुमारास नागपूर वनविभागाच्या वनपरिक्षेत्रात वाघाने शेतकऱ्याच्या गोठ्यातील तब्बल पाच बकऱ्या फस्त केल्या. हिंगाणी बफर क्षेत्रातील खापा येथील शेतकरी गोविंद राठोड यांच्या गोठ्यात त्यांनी बकऱ्या बांधून ठेवल्या होत्या. पाचपैकी एक बकरी उचलून नेली, तर चार बकऱ्यांचा घटनास्थळीच फडशा पाडला. या घटनेमुळे गावकरी देखील भयभीत झाले आहेत.

या घटनेची माहिती हिंगणी बफर वनपरिक्षेत्र अधिकारी शालिनी शिरपूरकर यांना मिळताच त्यांनी वनरक्षक श्री. नेवारे यांना घटनास्थळी पाठवून घटनेचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले. नागपूर जिल्ह्यातील खापा धोतीवाडा हे दोन्ही गाव बोर व्याघ्रप्रकल्पाला लागून आहेत. व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, अस्वलांच्या संखेत वाढ होत आहे. ते आपले भक्ष्य शोधण्यासाठी बोर व्याघ्रप्रकल्पातून लगतच्या गावातील शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना आपले भक्ष्य बनवत आहेत.

हा प्रकार नित्याचाच झाला आहे. जोड व्यवसाय म्हणून शेतकरी व गोपालक गाई, शेळीपालन करतात. निसर्ग साथ देत नाही, सरकार नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई देत नाही. वाघ, बिबट्यांकडून जनावरांना भक्ष्य बनवले जाते. वनविभाग पंचनामे करतात, पण मोबदला फारच कमी मिळतो. त्यासाठी महिनोनमहिने प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे धोतीवाडा, खापा सरपंच निलिमा ढोरे, उपसरपंच रमेश चव्हाण यांनी वनमंत्र्यासह आमदार, खासदारांना साकडे घातले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोर व्याघ्रप्रकल्पालगतच्या हिंगणी बफर, कोंढाळी, कारंजा या तिन्ही वनपरिक्षेत्रालगतच्या गावांमधील शेतकरी, गोपालक, शेळीपालक यांचे संरक्षण करा. आमच्या गावाचे पुनर्वसन करा, हिंस्त्र प्राण्यांची व्यवस्था करा, अशी विनंती वनमंत्री गणेश नाईक, आमदार चरणसिंग ठाकूर, खासदार श्यामकुमार बर्वे, खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे, आमदार सुमित वानखेडे यांना केली आहे.