“आजच्या स्पर्धात्मक युगात सतत बोलणे, ताबडतोब बोलणे याला अधिक महत्त्व आले आहे. जो जास्त बोलतो त्याला आपण हुशार समजतो. या बोलण्याच्या स्पर्धेमुळे आपण स्वत:शी संवाद साधणे, शांत राहणे विसरत चाललो आहे. स्वत:ला शोधणे थांबल्याने आज ध्यानसाधणा शिकवणारे मोठमोठे गुरू तयार झाले असून ते शांततेचाही व्यवसाय करीत आहेत.”, अशी खंत साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या शांता गोखले यांनी व्यक्त केली.

लेडी अमरितबाई डागा कॉलेज ऑफ वूमनच्या (एलएडी) इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित डॉ. कमला नारायणन स्मृती व्याख्यानात त्या बोलत होत्या. या ऑनलाईन कार्यक्रमात ‘कृपया आपण शांतता बाळगू शकतो का?’ या विषयावर बोलताना शांता गोखले यांनी कला आणि कलात्मकता यामध्ये शांततेचे महत्त्व काय हे सांगितले.

आयआयएम मध्ये एका कार्यक्रमातील उदाहरण सांगताना त्या म्हणाल्या, “भाषण सुरू असतानाच काही विद्यार्थी प्रश्न विचारायला लागले. त्यावर भाषण पूर्ण झाल्यावर प्रश्न विचारा असे सांगितले असता आयोजक आणि विद्यार्थी नाराज झाले. शेवटी आयोजकांनी सांगितले की, “जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यावर विद्यार्थ्यांना गुण मिळणार होते. त्यामुळे एखादे भाषण शांत बसून ऐकण्याला, ते आत्मसात करण्याला गुण नसून केवळ दिखाऊपणाला आपण अधिक महत्त्व देत चाललो आहे. एका संगीत कार्यक्रमात संगीतकाराची इच्छा होती की त्याने शेवटच्या तारा छेडल्यानंतरचा शांत आवाज प्रेक्षकांनी ऐकावा. मात्र तसे होताच टाळ्यांच्या कडकडाटात ती संधी सर्वांनी गमावली. आम्हाला सर्वत्र गोंगाट ऐकायची सवय झाली आहे. स्वत:शी संवाद साधायला, शांततेतून शिकायला, संभाषणातून चांगल्या गोष्टी टीपायला आम्ही विसरत चागलो आहे. त्यामुळेच आज अनेक ध्यानसाधनेचे धडे देणारे गुरू तयार झाले असून शांतताही विकली जाऊ लागल्याचेही त्या म्हणाल्या.”