नरखेड तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच एका शेतकऱ्याची बैलजोडी ठार झाली. या घटना आज (शनिवार) दुपारी घडल्या. योगेश रमेश पाठे (२७, हिवरमठ), दिनेश ज्ञानेश्वर कामडी (३४) व बाबाराव मुकाजी इंगळे (६० दोघेही मुक्तापूर) अशी मृतांची नावे आहेत.

शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास योगेश पाठे हा शेतात पेरणी करीत असताना पाऊस सुरू झाला. त्यामुळे योगेश घरी जाण्यासाठी रस्त्यावर असलेल्या दुचाकीजवळ पोहचला. परंतु, त्याच्या अंगावर वीज कोसळली.

मुक्तापूर गावातील दिनेश कामडी आणि बाबाराव इंगळे हे दोघे शेतात मशागतीसाठी गेले होते. पाऊस सुरू झाल्याने झोपडीत बसले. झोपडीवर वीज पडल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दिनेशचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. सायंकाळ झाली तरी मुलगा शेतातून न परतल्याने दिनेशचे वडील शेतात पाहायला गेले असता ही घटना उघडकीस आली.

तर, भिष्णूर गावातील सुनील तानबाजी कळंबे यांच्या शेतात बैलजोडी बांधलेली होती. दुपारी ३ वाजता वीज पडून बैलजोडीचा जागीच मृत्यू झाला.

१० दिवसांपूर्वीच झाले होते लग्न –

योगेश पाठे याचे गेल्या १० दिवसांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्याकडे ५ एकर शेती आहे. लग्नानंतर तो पहिल्यांदाच शेतात गेला होता त्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.