-रवींद्र जुनारकर

जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या विलास व मीना जांभुळकर या दाम्पत्यावर वाघाने हल्ला केला. त्यात मीनाचा मृत्यू झाला तर विलास बेशुध्दावस्थेत जंगलात मिळाला. मात्र ब्रम्हपुरी वन विभागाचे सहायक वनसंरक्षक यांनी चिमूर उपजिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांना पत्र देवून मीना जांभुळकर यांचे मृतदेहाचे जिल्हास्तरीय चमूकडून पूनश्च शवविच्छेदन करावे अशी विनंती केली आहे. तळोधी वनपरिक्षेत्रातील गोंदोडाच्या जंगलात वाघ किंवा इतर कुठल्याही वन्यप्राण्यांच्या पाऊल खूना किंवा कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद न आल्याने ही हत्या असावी असा संशय व्यक्त होत आहे.

चिमूर तालुक्यातील केवाडा येथील रहिवासी असलेले विलास व मीना जांभुळकर हे दाम्पत्य मंगळवार २४ मे रोजी तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील गोंदोडाच्या जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. तिथे या दाम्पत्यावर वाघाने हल्ला केला. यात पत्नी मीना हिचा मृत्यू झाला तर पती विलास हा आज घटनास्थळापासून बऱ्याच दूर अंतरावर बेशुध्दावस्थेत मिळाला. त्याचेवर चिमूर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मात्र ब्रम्हपुरी वन विभागाने आज बुधवारी चिमूर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांना एक पत्र दिले आहे. या पत्रातून सहायक वनसंरक्षक के.आर.धोडगे यांनी मीना जांभुळकर यांचे दुसऱ्यांना शवविच्छेदन करावे अशी विनंती केली आहे. काल मंगळवारी केलेल्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण वाघाच्या हल्ल्यामुळे डोक्यावर गंभीर जखम झाली. त्यातच मीना हिचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. परंतु वन विभागाकडून घटनास्थळी तथा परिसरात पथक लावून सविस्तर चौकशी व पाहणी केली असता मीना जांभुळकर यांना वाघाने हल्ला करून ठार केल्याबाबतचे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाही असे म्हटले आहे.

मृतदेहावर वाघाच्या दाताचे किंवा नखाचे निशाण, पाऊलखुणा, हेअर सॅम्पल किंवा परिसरात वाघाचा वावर होता असे काहीही मिळाले नाही. मृतदेहाचे डोक्याचे मागील बाजूला भारी वस्तूचे घाव केल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे मीना जांभुळकर यांना वाघाने हल्ला करून ठार केले किंवा कसे याबाबत वन विभाग संभ्रमात आहे. तेव्हा जिल्हास्तरीय चमूकडून मृतदेहाचे पूनश्च शवविच्छेदन करून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करावे असेही ब्रम्हपुरी वन विभागाने पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता मीना हिची हत्या तर करण्यात आी नाही असा संशय बळावला आहे.