नागपूर : तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांच्या समूहावर वाघिणीने केलेल्या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी दुपारी उशिरा आणखी एका महिलेचा मृतदेह जंगलात आढळून आल्याचे सांगितले जात असून त्यावर अजून अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
दोन स्वतंत्र समूह आणि एका समूहावर हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार तेंदूपत्ता जोडण्यासाठी दोन स्वतंत्र समूह जंगलात गेले होते. त्यातील एका समूहात सात महिला तर दुसऱ्या समूहात १३ महिला होत्या. यातील एक समूह परिसरातील नाल्याजवळ तर एक समूह आणखी दूर होता. त्याचवेळी या परिसरात माकडांचे आवाज सुरू झाल्याने नाल्याजवळ असणारा समूह सतर्क झाला. तर सात जणांच्या समूहाला याची काहीही माहिती नव्हती. हा परिसर तीन बछडेवाल्या वाघिणीचा अधिवास आहे. हे बछडे नुकतेच वयात आल्याने या वाघिणीच्या कुटूंबाने या सात जणांच्या समूहावर हल्ला केल्याचे स्थानिकांनी सांगितले. या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. काही महिला बेपत्ता असून त्यातील तीन महिला परत आल्या आहेत.
परिसरात आठ वाघांचे वास्तव्य
स्थानिकांच्या माहितीनुसार या परिसरात आठ वाघांचे वास्तव्य आहे. यात एक वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांचा समावेश आहे. हा परिसर घनदाट जंगलाने व्यापला असल्याने वाघाचा हल्ला झाला तरी तो शोधून काढणे अनंत अडचणीचे आहे. शुक्रवारच्या या घटनेतही वनखात्याला ही शोधमोहीम राबवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. घटनेनंतर वनविभाग, पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, सायंकाळपर्यंत आठ महिलांचा शोध लागलेला नव्हता. जंगलातील परिस्थिती धोकादायक असल्याने शोध पथकांना अत्यंत सावधगिरीने काम करावे लागत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून तेंदूपत्ता हंगामात जंगलात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वन विभागाने केवळ इशारे देण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
मुलींच्या डोक्यावरील छत्र हरपले
मृत महिलांमधील एका महिलेच्या पतीचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. तिला सात आणि दहा वर्षाच्या दोन मुली आहेत. वडिलांपाठोपाठ आईच्या निधनामुळे या मुलींच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरपले आहे. तर याच घटनेत दोन सख्या बहिणी आहेत. या दोन्ही बहिणींवर भावाची, आईची आणि संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी होती. गावात इतर कोणताही रोजगार नसल्याने संपूर्ण गावकरीच तेंदुपत्ता आणि मोहफुलाच्या हंगामावर अवलंबून असतात. मात्र, आता रोजगारच नाही तर जीवही गेल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
