scorecardresearch

नागपूरमधील आफ्रिकन सफारीचा मार्ग मोकळा ; अर्थसंकल्पात निधीची तरतूद, आराखडाही मंजूर

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात २६ जानेवारी २०२१ ला १२० हेक्टरवरील भारतीय सफारीची सुरुवात झाली

नागपूर : महाराष्ट्र सरकारने २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतर आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने आराखडा व सफारीसाठी मंजुरी दिल्यानंतर उपराजधानीतील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील अफ्रिकन सफारीचा मार्ग मोकळा झाला आहे. वनविकास महामंडळाने अफ्रिकन सफारीवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

भारतातील सर्वात मोठय़ा प्राणिसंग्रहालयापैकी एक येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात २६ जानेवारी २०२१ ला १२० हेक्टरवरील भारतीय सफारीची सुरुवात झाली. आता दुसऱ्या टप्प्यात अफ्रिकन सफारीचे काम सुरू होत आहे. त्यासाठी राज्य सरकारने केलेली १०० कोटी रुपयांची तरतूद आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची आराखडा व सफारीसाठी मंजुरी मिळाली. रेखाचित्रे तयार करण्यासाठी वास्तुशिल्प सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया व लवकरच सुरू केली जाईल. त्यानंतर दोन महिन्यात ही निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, असे वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन यांनी सांगितले.

प्राणिसंग्रहालयात प्राण्यांच्या सुमारे २८ प्रजाती राहतील. यात झेब्रा, सिंह, जिराफ, चित्ता, चिंपांझी, वाइल्डबीस्ट, हिप्पोपोटॅमस, बबून्स यांचा समावेश आहे. ६३ हेक्टर परिसरात भारतीय सफारीच्यामागे अफ्रिकन सफारी असणार आहे. त्यात सुमारे १३ पिंजरे राहतील. साहसी वन्यजीव सफारीच्या बाबतीत आफ्रिका अव्वल स्थानावर आहे. पण आता असाच अनुभव नागपुरातील पर्यटकांना देण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे.

देशविदेशातील प्राणिसंग्रहालयांशी बोलणी

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय हे भारतातील एक उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय व्हावे याकरिता देशविदेशातील प्राणिसंग्रहालयाशी बोलणी सुरू आहेत. त्यापैकी दुबई सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्राणिसंग्रहालयाशी बोलणी यशस्वी झाली आहे. या प्राणिसंग्रहालयातून अफ्रिकन प्राण्यांच्या प्रजाती आणण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. तसेच या सफारीसाठी भारतातील इतर प्राणिसंग्रहालयातूनही प्राणी आणण्याच्या पर्यायावर विचार केला जात आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur to get a 100 crore african animal safari zws

ताज्या बातम्या