भंडारा : होळी आणि रंगपंचमी असे दोन दिवस रावणवाडी जलाशय पर्यटकांसाठी बंद असताना नागपूर येथील काही पर्यटक रावणवाडी जलाशय परिसरात होळी साजरी करण्यासाठी गेले. मात्र बोटिंग दरम्यान जलाशयात मधोमध बोट उलटून नागपूर येथील एका पर्यटकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना काल घडली आहे. या घटनेमुळे पर्यटनाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षेच्या त्रुटी आणि पर्यटकांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी येथे जलपर्यटनासाठी नागपूरहून काही मित्रमंडळी आलेली होती. नागपूरहून रावणवाडी जलाशयावर सहलीसाठी आलेले हे मित्र बोटिंग करत असताना अचानक बोट उलटली. नागपूरच्या सौरभ मेहरा (वय ३०) या तरुणाचा जलाशयात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. होळीच्या निमित्ताने मौजमजा करण्यासाठी १५ ते २० मित्र नागपूरहून भंडाऱ्याला आले होते.
बोटिंग करताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची बोट अचानक पलटली. दरम्यान इतर पाच जणांना पोहता येत असल्यामुळे त्यांनी पोहत किनारा गाठत जीव वाचवला. मात्र सौरभ याला पोहता न आल्याने तो पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला.
याबाबत रावणवाडी वन हक्क समितीचे विजय राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी ते स्वतः दुपारी १ वाजता पर्यंत घटनास्थळी त्यांच्या दोन गार्डसोबत तेथे हजर होते. पोलीसही त्या ठिकाणी होते. रावणवाडी जलाशय परिसरात होळीचे दोन दिवस बंदी असतानाही नागपूरच्या या तरुणांनी कोणालाही न जुमानता वाहन आत टाकले. नागपूर वरून आलेल्या तरुणांनी त्यांच्याशी शाब्दिक बाचाबाचीही केली होती, शिवाय त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी दोन गार्डवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न केल्याचे राऊत यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. बोटिंगही त्यावेळी बंद असताना या तरुणांनी स्वतः बांधलेली बोट काढून जलाशयात सोडली त्यावेळी काही गावकऱ्यांशी त्यांचा वाद झाला. राऊत हे जेवायला घरी गेलेले असताना त्याच दरम्यान ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
