नागपूर : नेपाळमधील नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीव व वित्त हानी झाली. घरे कोसळून गेलीत. डोळ्यादेखत लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पुरामुळे निर्माण झालेल्या संकटात हजारो पर्यंटक अडकून पडलेत. यात भारतातील पर्यंटक होते. नागपूर शहरातील १०६ पर्यटक तिकडे अडकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सर्व जण सुखरूप भारतात परतलेत. तर यातील ४ जण हे आज आपल्या घरी आलेत. हे चारही जण काठमांडू येथून विमानाने दिल्लीत व तेथून रेल्वेने नागपूरला आलेत. यांनी घटनाक्रम बोलून दाखवला. तेथील महापुराची माहिती नसल्याने भीती वाटली नाही. परंतु पोलीसवाल्यांनी रोखल्यावर कळलं आणि धडकी भरली, भीतीही वाटली, असे परत आलेल्या नागरिकांनी सांगितले.
चार जण परतले!
नागपुरातून १०६ जण काठमांडूला धार्मिकस्थळांच्या दर्शनासाठी गेले होते. यातील चार जण परतले. यात इंदिरा चौधरी , सुलोचना खापरे, दीपक पांडे आणि वर्षा उपाध्याय यांचा समावेश आहे. हे चारही जण काठमांडू येथून विमानाने दिल्लीत आले. तेथून रेल्वेने आज नागपुरात दाखल झाले. त्यांच्यासोबत असलेले इतर १०२ जण बिहार येथील पटणा येथे बसने येणार असून तेथून ते रेल्वेने रविवारला येतील.
इंदिरा चौधरी म्हणाल्या, पोर म्हणत होती निघा…
इंदिरा चौधरी सांगितले की, १९ ऑगस्टला काठमांडूला पोहोचलो. तेथून पशुपाथीनाथ व इतर धार्मिक स्थळांची पाहणी केली. आमच्या सोबत इतरही जण होते. नेपाळमधील पुराची आम्हाला काहीच माहिती नव्हती. आम्ही फार दूर होतो. परंतु पोरांनी संपर्क साधून महापुराची माहिती दिली. परंतु त्यांच्याकडे कानाडोळा केला. आम्ही जायला निघालो, तेव्हा पोलिसांनी गाडी अडवली आणि समोर जाता येणार नसल्याचे सांगितले.
पूल तुटले असून रस्ता खराब असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर संपूर्ण प्रकार कडला आणि भीती वाटायला लागली. आम्ही पुरत काठमांडूला आलो. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क केला. आमच्यासाठी खासदारांनी बसची व्यवस्था करून दिली. परंतु रात्र झाल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तेथील सुरक्षा दलाने आम्हाला जाण्यास मनाई केली. त्यामुळे सर्व जण परत गेलो. पोराने विमानाची तिकीट बूक केली. त्यामुळे दिल्लीपर्यंत विमानाने आलो, असे त्यांनी सांगितले
