नागपूर : ‘थोडं पुढे जाऊन दुभाजकाकडून वळण घेण्यापेक्षा उलट्या दिशेनेच वाहन चालवले तर पाच मिनिटे वाचतील…’ हा विचार करून निष्पाप पादचाऱ्यांच्या जिवाशी खेळणारे वाहनचालक सर्रास दिसतात. वेळेची बचत करण्यासाठी नियमांना बगल देत स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळण्याची जणू स्पर्धाच लागली आहे, का अशी सध्या शहरात सर्वच रस्त्यांवर परिस्थिती आहे. नियमांना डावलून उलट्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांची संख्या कारवाईनंतरही वाढत चालली आहे.

चालू वर्षात ११ सप्टेंबर पर्यंत वाहतूक शाखेने विरुद्ध दिशेने वाहन चालणाऱ्या ९,६१५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगरला. गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण ८,०७९  इतके होते. याचा अर्थ पोलीस कारवाईनंतर विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांना कायद्याचा धाकच उरलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे. वाहतूक शाखेने गेल्यावर्षी ९,८३७ बेशिस्त वाहनधारकांना दंड लावला होता.

हलगर्जीपणात एमआयडीसी सर्वांत पुढे

उलट्या दिशेने वाहन दामटणाऱ्यांमध्ये एमआयडीसी परिमंडळात दुपटीने वाढ झाली. गेल्या वर्षी एमआयडीसीत विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ९८८ जणांवर दंडात्मक कारवाई झाली. चालू वर्षात यामध्ये दुप्पट वाढ होऊन हा आकडा १,९९४ वर पोहोचला. सदर भागात गेल्यावर्षी ५६१ वाहनधारकांवर कारवाई झाली होती. चालू वर्षात परिसरात अशा ९७८  बेशिस्तांना पोलिसांनी दंड लावला. सोनेगाव परिमंडळात गेल्यावर्षी ५९३ वरील आकडा ९४० पर्यंत वाढला. इंदोरातही विरुद्ध दिशेने वाहन दामटणाऱ्यांची संख्या ६४१ वरून  वाढत ७३० वर पोहोचली.

रोज १३ वाहनचालकांवर गुन्हे तरीही संख्या थांबेना

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून उलट्या दिशेने वाहन चालवत स्वतःच्या तसेच इतर वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहिम राबवली जात आहे. वाहतूक शाखेने या मोहिमेअंतर्गत २३ ऑगस्ट पासून आतापर्यंत १९० गुन्हे दाखल केले आहेत. कारवाई होत असली तरी नागरिकांच्या मनमानीला लगाम लागलेला नाही. उलट्या दिशेने वाहने चालवणाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण हे सोनेगावमध्ये आहे. या एकट्या भागात अवघ्या १५ दिवसांत ४५ वाहनचालकांवर गुन्हे दाखल झाले. त्या खालोखाल २१ गुन्हे कॉटन मार्केट, १९ गुन्हे इंदोरात, तर १८ गुन्हे एमआयडीसीत दाखल झाले.

इतरांच्या जीवाची चिंता नाही

नागपूरकाही मिनिटांचा वेळ आणि थोडेसे इंधन वाचवण्यासाठी नागपूरच्या रस्त्यांवर सर्रास ‘उलट्या दिशेने’ वाहने पळवली जातात. हा केवळ वाहतूक नियमांचा भंग नसून, समोरून येणाऱ्या शिस्तप्रिय वाहनचालकांच्या जिवाशी थेट खेळ चालला आहे.  नागपूर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांची संख्या हजारोच्या पार गेली असली, तरी ‘उलट्या दिशेने ‘ गाडी चालवणाऱ्यांची दमदाटी आणि मनमानी थांबलेली नाही.  

नागपुरातील हे चौक अन् मार्ग ठरताहेत ‘हॉटस्पॉट’:

सदर व संविधान चौक हे परिसर शहरातील सर्वांत व्यस्त भागांपैकी एक आहेत. या परिसरात सायंकाळच्या वेळी अंतर्गत मार्ग आणि उड्डाणपुलांच्या उतारावर यु-टर्न टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहने चुकीच्या दिशेने येतात. बाजारपेठेमुळे अंतर्गत भागातील रस्त्यांवर वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे आधीच रुंद रस्ता पुर्णतः बंद होतो. यातून मार्ग काढण्यासाठी वाहनधाक विरुद्ध दिशेने गाड्या चालवतात. सोनेगाव व वर्धा रोडवर विमानतळ मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिवेगाने येणाऱ्या गाड्यांसमोर अचानक उलट्या दिशेने येणारी वाहने समोर उभी ठाकतात. विशेषतः सायंकाळच्या वेळी ही समस्या मोठी होते.

पूर्व नागपुरातील लकडगंज ते पारडी चौकात अवजड वाहतुकीचा पट्टा आहे. या भागात शहरातील काही व्यापाऱ्यांची गोदामे आहेत. त्यामुळे येथे अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. त्यात दुचाकी व ऑटोचालक सर्रास उलट्या दिशेने धावताना दिसतात.   चौक ओलांडण्याचा फेरा वाचवण्यासाठी सक्करदरा आणि अजनी मार्गावर सगळेच नियम पायदळी तुडवले जातात.  नियम तोडणाऱ्यांची मानसिकता आणि पोलिसांचे ‘ऑपरेशन नो रॉन्ग साईड’वाहनांची संख्या वाढली असली तरी अवघ्या १०० मीटरचा यु-टर्न वाचवण्यासाठी लोक थेट विरुद्ध दिशेने गाड्या घुसवतात. पूर्व आणि मध्य नागपूरला जोडणाऱ्या कॉटन मार्केटचा परिसर अत्यंत गजबजलेल्या व्यापारी भाग आहे. मात्र येथे दुचाकी आणि ऑटोचालक थेट वाहतुकीच्या प्रवाहाला छेद देतात. बडकस चौक व झेंडा चौकात रस्ते अत्यंत अरुंद आहेत. त्यात बाजारामुळे येथे गर्दी असते. या भागात खरेदीसाठी येणारे ग्राहक थेट विरुद्ध दिशेने वाहने चालवतात.

सीसीटीव्ही यंत्रणा ठरतेय कुचकामी

स्मार्ट सीटी अंतर्गत महापालिकेने शहरभर ३ हजारांहून अधिक एआय आधारीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र यातील अनेक कॅमेरे देखभाल दुरूस्ती अभावी बंद आहेत. यातून एकीकडे एकीकडे विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर अंकूश लावणे कठीण होत आहे. शहरातील बंद कँमेरांवरून न्यायालयाने देखील वेळोवेळी स्मार्ट सिटी, महापालिका आणि वाहतूक शाखेला फटकारले आहे. मात्र तरीही सीसीटीव्ही यंत्रणेत सुधारणा होत नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचा माग काढणे देखील पोलीसांसमोरचे मोठे आव्हान ठरत आहे.

शॉर्टकट’चा मोह इतरांच्या जिवाशी खेळणारा

रस्ते अपघातांना आळा घालून कोंडी फोडण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांविरोधात मोहीम राबवूनही बेशिस्तांचे प्रमाण कमी होण्या एवजी वाढत आहे. ‘शॉर्टकट’चा मोह इतरांच्या जिवाशी खेळणारा आहे. त्यामुळे वारंवार अशी शिस्त मोडमाऱ्यांचा परवाना रद्द करून त्यांची वाहने जप्त केली जातील. असे -आदित्य मिरखेलकर, (उपायुक्त, वाहतूक शाखा) म्हणाले.

नागरीकांच्या भावना काय….

पाचपावली उड्डाणपूलाचे सध्या काम सुरू आहे. त्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहनांसमोर अचानक विरुद्ध दिशेने दुचाकी आणि ऑटो समोर येतात. हा भाग अपघातांचा मोठा ‘डेथ ट्रॅप’ बनला आहे. या भागातून जाताना कायम भघती वाटते., असे स्वप्नील बनकर, (विमा प्रतिनिधी) म्हणाले. सध्या इंदोरा चौक ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एका दिशेने वाहतूक पूर्णतः बंद आहे. अशा वेळी कामठी मार्गावरून येणारे ऑटोचालक आणि खासगी बस चालक सर्रास विरुद्ध दिशेने गाड्या चावलात, असे दीपेश मेंघानी, (व्यापारी, जरिपटका) म्हणाले.
 
अनेक ठिकाणी यु-टर्न खूप लांब अंतरावर आहेत. महापालिका व एनएचएआयने रस्त्यांची रचना आणि दुभाजक वैज्ञानिकदृष्ट्या योग्य ठेवलेले नाहीत. त्यामुळे वाहनधारक मोठा फेरा टाळण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहने हाकतात. याचा फटका नियम पाळणाऱ्यांना बसतो, असे -प्रवीण पाटील,( रक्तपेढी व्यवस्थापक) म्हणाले.