नागपूर : मद्य प्राशन करून वाहन चालवताना स्टंटबाजीचा मोह अनावर झालेल्या ४० वाहनधारकांच्या मस्तीचा रंग वाहतूक शाखेने उतरवला. स्टंटबाजीच्या सर्वाधिक कारवाया या एकट्या लकडगंज पोलीस हद्दीत करण्यात आल्या. एकाच दिवशी वाहतूक शाखेने मंगळवारी २९ स्टंटबाज दुचाकीस्वारांची झिंग उतरवली.
सोनेगावात ४, एमआयडीत २ तर पारडी, सक्करदरा, इंदोरा आणि कॉटनमार्केट वाहतूक शाखा पोलीस हद्दीत प्रत्येकी १ स्टंटबाज वाहनचालकांना पोलिसांनी हिसका दाखवला. होळीच्या पार्श्वभूमीवर शहरात दोन दिवसांत ३२४५ वाहनधारकांना विविध कारणांनी दंड ठोठावण्यात आला. कॉटन मार्केट भागात ट्रिपल सीटच्या ३१ कारवाया करण्यात आल्या, तर इंदोरा विभागातही ३१ जणांवर कारवाई झाली.
दोन दिवसांत उतरवली २०५ जणांची झिंग
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, होळी सणाच्या पार्श्वभूमीवर २ व ३ मार्चला वाहतूक पोलिसांनी एकूण २०५ मद्य प्राशन करून वाहन चालविण्याचे (डीडी) गुन्हे नोंदविण्यात आले. जड वाहनांवर १६० कारवाया करण्यात आल्या. ट्रिपल सीट वाहनचालकांवर १८९ चालान बजावण्यात आले. चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्या ८२ जणांवर दंडात्मक कारवाई झाली. धोकादायक वेगाने वाहन चालविणाऱ्या ४० प्रकरणांची नोंद झाली आहे.
मद्यप्राशनाच्या कारवायांत लकडंगज प्रथम
लकडगंज विभागात सर्वाधिक २७ जणांन मद्य प्राशन करून वाहन चालवल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली. त्या खालोखाल तर पारडी विभागात ३० डीडी कारवाया करण्यात आल्या. अजनी विभागात ५४६ इतर चलानांना दंड लावण्यात आला. सोनेगावात ५१७ आणि लकडगंजमध्ये ४९८ वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला.
