नागपूर : मानकापूर परिसरात रोडरेजची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री घरी परतणाऱ्या वाहतूक पोलीसाला ७ ते ८ दुचाकीस्वारांनी पाठलाग करून बेदम मारहाण केली. दगडाने त्यांच्या कारची तोडफोड करत जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणातील सर्व आरोपींची ओळख पटली असून सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं….

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल मधुसूदन सिंह (३५) हे एमआयडीसी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. ते २८ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ते जरीपटका येथून महिला मैत्रिणीसोबत ह्युंदाई व्हर्ना कारने मानकापूरकडे घरी परतत होते.

मार्टिन नगर पुलाच्या चढावर असताना ७ ते ८ दुचाकीस्वार भरधाव आणि झिगझॅग पद्धतीने वाहन चालवत त्यांच्या कारसमोर येत होते. त्यामुळे कुणाल सिंह यांनी हॉर्न वाजवला. दुचाकीस्वारांनी बाजू दिली आणि कार पुढे निघाली.

कारचालकाला घेरलं….

सिंह हे मानकापूर चौकाजवळ पोहोचताच दुचाकीस्वारांनी कारला मागून धडक दिली. त्यानंतर एका बुलेटस्वाराने कारचा रस्ता अडवला आणि काही क्षणांतच इतर साथीदारही तेथे जमा झाले.

अखेर टोळी सापडली जाळ्यात…

१४ जणांच्या टोळीने कारचालकाला रस्त्यात अडवून त्यांच्यावर हल्ला केला. वाहनाची तोडफोड केली. मात्र, मानकापूर पोलिसांनी वेळीच कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत टोळीला ताब्यात घेतले.

हे आहेत हे संघटीत गुंड….

वाहतूक पोलिसाची कार अडवून त्यांना मारहाण करणाऱ्या १४ जणांच्या टोळक्याला पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. यात हर्ष उर्फ पिंडा आनंद पवार (२१), गौरव उर्फ मन्या मनोहर घिडरे (२६), संयम उर्फ भांजा गणेश पुरी (२०), यश सुरेश परतेकी (२१), सत्यम नरेंद्र शिर्के (२०), प्रेमराज उर्फ सुजल अनिल धकाते (२०), आकाश वामन बोकडे (२०), नितीन राकेश गोखले (१८), विक्की गजानन तेलघरे (२५), भिमदेव उर्फ सागर वामन बोकडे (१८), विक्की अरविंद भजनकर (२३), गणेश सुरेश उईके (२३), प्रितम उर्फ पांड्या लक्ष्मण मोदेकर (२१) आणि टिकराम हेमजार बारापात्रे (२०) या १४ जणांचा समावेश आहे.

यानंतर आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत कार न थांबवल्याचा राग व्यक्त केला. एका आरोपीने दगडाने कारच्या बोनटवर प्रहार केला, तर दुसऱ्याने मागील काच फोडून वाहनाचे मोठे नुकसान केले. कुणाल सिंह कारमधून खाली उतरताच आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एका आरोपीने दगडाने त्यांच्या मान आणि पाठीवर वार केल्याने ते जखमी झाले.

घटनास्थळी स्थानिक नागरिक जमा होताच आरोपी तेथून पसार झाले. मात्र काही नागरिकांनी एका दुचाकीचा नोंदणी क्रमांक टिपून ठेवला. त्याच धाग्यावरून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी सर्व आरोपींची ओळख पटवली.

मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कालसेकर यांनी सांगितले की, या प्रकरणातील काही आरोपी अल्पवयीन आहेत. सर्व आरोपींची ओळख पटली असून त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत बेकायदेशीर जमाव, दंगल, जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ, मालमत्तेचे नुकसान आणि मारहाण यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील कलमे जामीनपात्र असून पुढील तपास सुरू आहे.