यवतमाळ : वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात टिप्परखाली चिरडल्याने दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला देवानंद दिलीप दोडके आणि शुभम उकंडा पाटे अशी मृत तरूणांची नावे आहेत. हा भीषण अपघात महागाव तालुक्यातील हिवरा संगम गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर आज शनिवारी दुपारी एक वाजाताच्या सुमारास झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या टिप्परचा पाठलाग यवतमाळ आरटीओकडून सुरू होता. वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ पथक विरा लॉजच्या मागे लपून बसले होते, असा आरोप आता होत आहे. आरटीओ पथकाला चकमा देऊन पळ काढण्याच्या उद्देशाने चालक वेगाने टिप्पर पळवत होता.

पाठलागादरम्यानच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर आरटीओ पथक घटनास्थळी न थांबता महागावच्या दिशेने निघून गेल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. या अपघाताची तीव्रता इतकी होती की, दुचाकीस्वार देवानंद दोडके हा टिप्परच्या चाकाखाली चिरडला तर शुभम पाटे हा दूरवर फेकला गेला. वाळूने भरलेला टिप्पर रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाच्या तणाव्याला अडकून त्याचे समोरचे चाक निखळून पडले.

दुचाकीचे कित्येक तुकडे झाले असून घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल झाल्याचे हृदयद्रावक दृश्य होते. अपघातानंतर टिप्परचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघातातील शुभम पाटे हा जिवंत असेल या आशेने त्यास माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व नंतर यवतमाळ येथे हलविण्यात आले, परंतू तेथे त्यास मृत घोषित करण्यात आले. देवानंद दोडके याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. महामार्गावर सुरू असलेली बेशिस्त वाळू वाहतूक रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महागाव तालुक्यात वाळू माफियांचा सुळसुळाट आहेच, मात्र त्याहीपेक्षा आरटीओचा ससेमिरा अधिक असल्याचा आरोप होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच हिवरा येथील सर्पमित्र आशिष हातमोडे, विवेक कदम यांनी प्रसंगावधान राखत जखमीला खासगी वाहनातून तातडीने रुग्णालयात हलविले. ग्रामपंचायत सदस्य राजू धोतरकर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. ठाणेदार धनराज निळे, महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक किशोर गवई यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गेल्या दोन दिवसांत याच ठिकाणी झालेला हा दुसरा अपघात असून, दोन्ही अपघातांत दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.