राज्याची उपराजधानी नागपूरमधील शासकीय दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी प्रशासनाने जुन्या वर्गखोल्यांमध्ये शिकवण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. यासाठी दोन स्मार्ट वर्गखोल्या विकसित केल्या आहेत. त्यात लर्निंग मॉड्युलर सिस्टीम सॉफ्टवेअरद्वारे डिजिटल शिक्षणाची सोय केल्याने विद्यार्थ्यांना एका क्लिकमध्ये अद्ययावत शिक्षण घेता येईल.

शासकीय दंत महाविद्यालयाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने येथे दोन स्मार्ट क्लासरूम तयार करताना डेटा, विद्यार्थ्यांची हजेरी, त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा, अभ्यासातील गती, आवडीनिवडी, याशिवाय विद्यापीठातील विविध कार्यक्रम, घटनाक्रम, वैद्यकीय परिषदा- कार्यशाळा, व्याख्याने यात विद्यार्थ्यांचा सहभाग अशा महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश असेल, अशी विद्यार्थी केंद्रित स्मार्ट वर्गखोली तयार केली. वायफायच्या माध्यमातून स्मार्ट क्लासरूमध्ये लावण्यात आलेल्या एलसीडीवर संगणकीय प्रणालीतून सर्वच ॲप कनेक्टिव्हिटीतून जोडण्यात आले आहेत, अशी माहिती अधिष्ठाता प्रा. डॉ. अभय दातारकर यांनी दिली.

‘नॅक’साठी बदल –

शासकीय दंत महाविद्यालयातील नवीन स्मार्ट वर्गखोलीतील ‘बोर्ड’ विविधरंगी आहे. येणाऱ्या काळात शासकीय दंत महाविद्यालयाला ‘नॅक’चा दर्जा मिळावा या हेतूने हे बदल केले जात आहे. या दोन वर्गखोल्यांना ‘स्वाध्याय-१’ आणि ‘स्वाध्याय-२’ असे नाव दिले गेले आहे.