नागपूर : इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या मुलीचा गुरुवारी पेपर असल्याने तिला केंद्रापर्यंत नेऊन सोडण्यासाठी निघालेल्या पित्यासह मुलीवर वाटेत दबा धरून बसलेल्या काळाने झडप घातली. उमरेड तालुक्यातील मोहपा येथे सकाळी सव्वा दहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाता बाप- लेकीचा जागीच मृत्यू झाला.
सुभाष केशवराव भिवनकर (५०) आणि जान्हवी सुभाष भिवनकर (१७) अशी या अपघातात दगावलेल्या बाप- लेकीची नावे आहेत.
मोहपा येथील रहिवासी सुभाष यांची मुलगी जान्हवी हिचा गुरुवारी पेपर होता. उमरेडच्या पब्लिक हायस्कूल येथे जान्हवी आणि तिची मैत्रिण वंशिका ज्ञानेश्वर नरुळे या दोघींचे परीक्षा केंद्र होते. त्यामुळे मुलीला परीक्षा केंद्रावर नेऊन सोडण्यासाठी सुभाष हे जान्हवी आणि वंशिका या दोघींना घेऊन परीक्षा केंद्राकडे जात होते.
गाव सोडल्यानंतर अवघ्या काही किलोमीटर अंतरावर समोरून खडीने भरलेला एक ट्रक भरधाव वेगात येत होता. ट्रकने दुचाकी चालकाला समोरून धडक दिली. यात जान्हवी आणि सुभाष हे दोघे जागीच गतप्राण झाले. तर वंशिका नरुले (१८) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात इतका भीषण होता की वडील आणि मुलगी जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक वाहन घेऊन पळून जात होता. स्थानिक नागरिकांनी ट्रक आणि चालकाला ताब्यात घेत चांगलाच चोप दिला. संतप्त नागरिकांनी ट्रकच्या केबिनला आग लावली. ज्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरसीबी पथकासह अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकरणी उमरेड पोलीसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चालकास चोप ; प्रकृती अस्वस्थ
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली, संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त टिप्परच्या चालकाला पकडून चांगलाच चोप दिला. मारहाणीमुळे त्याची प्रकृतीही अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, संबंधित टिप्पर हा उमरेड येथील दुर्गा नगर परिसरातील ब्रम्हे यांचा असल्याची माहिती समोर आली.
पोलीस वाहनांची तोडफोड
अपघाताची बातमी पसरताच घटनास्थळी गर्दी झाली. संतप्त जमावाने टिप्परला आग लावून निषेध व्यक्त केला. ग्रामस्थांचा राग एवढ्यावरच शांत झाला नाही तर त्यांनी पोलीस वाहनाची तोडफोड करत संताप व्यक्त केला. परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन तसेच पोलीस निरीक्षक धनाजी जळक घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
