नागपूर : रात्रीची वेळ… शेताच्या बांधालगत असलेल्या जुन्या विहिरीतून अचानक डरकाळीसदृश आवाज येऊ लागला आणि पांढरताल गावातील ग्रामस्थांची धडधड वाढली. जवळ जाऊन पाहिले असता विहिरीच्या अंधारात एक वाघाचा बछडा जीवाच्या आकांताने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले.

ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली आणि त्यानंतर सुरू झाले तब्बल काही तासांचे थरारक बचाव अभियान. मात्र, या संपूर्ण घटनेचा सर्वाधिक हृदयस्पर्शी क्षण ठरला तो म्हणजे आईपासून दुरावलेल्या त्या मादी बछड्याचे अवघ्या २४ तासांत वाघिणीसोबत झालेले पुनर्मिलन.

येथे पडला विहिरीत

उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील लोहारा उपवनक्षेत्राच्या हद्दीतील पांढरताल (रिठी) येथे नारायण महादेव धोंगडे यांच्या शेतातील विहिरीत बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा बछडा पडला. परिसरात हालचाल सुरू झाल्यानंतर गावकऱ्यांना संशय आला. विहिरीत डोकावून पाहताच पाण्यात जीव वाचवण्यासाठी धडपडणारा वाघाचा बछडा दिसला.

बछड्याला सुखरूप बाहेर काढले

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक मनोज धनविजय, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. डी. बाम्हे यांच्यासह सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल असल्याने आणि बछडा पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला त्याला बाहेर काढणे अवघड ठरत होते. वनकर्मचाऱ्यांनी विहिरीत दोरीच्या साहाय्याने लाकडी खाट सोडली. काही वेळाने थकलेला बछडा त्या खाटेवर जाऊन बसला. मात्र, पिंजऱ्यात जाण्यास तो तयार नव्हता. दरम्यान, विहिरीभोवती ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभागाच्या चमूने अत्यंत काळजीपूर्वक त्या बछड्याला सुखरूप बाहेर काढले.

वनविभागाने घेतला निर्णय

सुमारे एक वर्ष वयाच्या त्या मादी बछड्याला तातडीने सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आले. वैद्यकीय तपासणीत बछडा पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वनाधिकाऱ्यांसमोर मोठा प्रश्न होता तो म्हणजे या बछड्याचे पुढे काय करायचे? अनेकदा अशा घटनांमध्ये आईपासून दुरावलेले बछडे कायमस्वरूपी बंदिस्त देखभालीत ठेवावे लागतात. मात्र, या वेळी वनविभागाने वेगळा निर्णय घेतला.

बछड्याला आईकडे सोडण्याची योजना

बछड्याला पुन्हा त्याच्या आईकडे सोडण्याची योजना आखण्यात आली. रात्री उशिरा मुनिया संवर्धन क्षेत्रालगतच्या वनमार्गिकेत बछड्याचा पिंजरा नेण्यात आला. परिसरात वाघिणीच्या हालचाली आधीपासूनच आढळत होत्या. पिंजऱ्यातून येणाऱ्या बछड्याच्या आवाजामुळे काही वेळातच वाघीण त्या परिसरात आली. ती झुडपात दबा धरून बसल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री होताच पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्यात आला आणि पुढच्याच क्षणी बछड्याने धावत जाऊन आपल्या आईकडे झेप घेतली. काही क्षणांतच दोघेही जंगलाच्या दिशेने अदृश्य झाले.

वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण, विहिरीत पडलेल्या आणि मानवी संपर्कात आलेल्या बछड्याचे इतक्या कमी वेळात आईसोबत पुनर्मिलन होणे दुर्मीळ मानले जाते. वनाधिकाऱ्यांच्या तातडीच्या निर्णयामुळे आणि समन्वयामुळे हा बछडा कायमचा जेरबंद होण्यापासून वाचल्याची भावना वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली.