नागपूर: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाच्या इयत्ता १२ वी बोर्डाच्या पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड हे पेपरफुटीचे केंद्र ठरले आहे. उमरेड येथील खासगी शिकवणी वर्गातून फुटलेल्या १२ वी बोर्डाच्या रसायनशास्त्र पेपरमध्ये आणि प्रत्यक्ष बोर्डाच्या पेपरमध्ये साधर्म्य आढळले आहे. उमरेड येथील टार्गेट अकादमी ऑफ सायन्सेस या खासगी शिकवणी वर्गातून हा पेपर फुटला होता. संस्थेचा संचालक अतुल चौधरी याने अतिरिक्त पैसे देऊन हा पेपर खरेदी केला होता. त्यानेच विद्यार्थ्यांना चढ्या दरांत हा पेपर उपलब्ध करून दिला होता. उमरेड पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अतुल चौधरी याला अटक केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अतूलकडे १२ वी बोर्डाचा रसायनशास्त्राचा हा पेपर २५ जानेवारी या दिवशीच पोहोचला होता. त्यानंतर जवळजवळ २० दिवसांनंतर रसायनशास्त्राचा पेपर होता. त्यामुळे महिनाभरापूर्वीच त्याच्याकडे हा पेपर कुठून आला, याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

बोर्डाची खरी परीक्षा आता सुरू

नागपूर येथील सेंट उर्सूला शाळेतील परिक्षा केंद्रावर १८ तारखेला रसायनशास्त्राचा पेपर सुरू असताना एक विद्यार्थीनी सतत स्वच्छतागृहाकडे जात होती. परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षिकेला यावर संशय आल्याने त्यांनी सदर पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पेपर फुटीचे प्रकरण समोर आले. या प्रकरणात सदर पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे.

दरम्यान हा पेपर जयताळा येथील विद्यासाधना केंद्रातून फुटल्याचेही पुरावे सदर पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या हाती लागले होते. त्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी बोर्डातून पेपर फुटला नसल्याचा दावा केला होता. मात्र उमरेडच्या खासगी शिकवणीवर्गाकडे परीक्षेच्या आधी २० दिवसांपूर्वीच रसायनशास्त्राचा पेपर आढळल्याने आता खरी बोर्डाची परिक्षा सुरू होणार आहे.

संस्थाचालकच निघाला पेपर फुटीचा सूत्रधार

१२ वीच्या पेपरफुटी प्रकरणात तपास करत असलेल्या विशेष पथक पोलिसांनी अटक केलेला जयताळा येथील विद्यासाधना शिक्षण संस्थेचा संचालकच मुख्य सुत्रधार असून त्यानेच खासगी शिकवणी संचालकाला हे पेपर उपलब्ध करून दिल्याचे डिजिटल फुटप्रिंट विशेष पथकाच्या हाती लागले आहेत.

संदिप बाबुराव सरटकर (५४) असे या संस्थाचालकाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला गेल्या शुक्रवारीच अटक केली होती. तोच आता या पेपर फुटीतला सूत्रधार असल्याचे पोलिसांना तपासात आढळले असून त्याने राज्यातील आणखी किती खासगी शिकवणी संचालकांना हे पेपर उपलब्ध करून दिले होते का आणि या माध्यमातून लाखो रुपये उकळले होते, का याचीही आता पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांच्या चौकशीत रसायनशास्त्रासोबतच भौतिकशास्त्र आणि नंतर गणित विषयाचेही पेपर फुटल्याचे पुरावे हाती लागले. केंद्रावरील विद्यार्थीनीकडून पोलिसांनी हस्तगत केलेल्या भ्रमणदूरध्वनीत समाजमाध्यमावरील व्हॉट्सअप गटातील संदेशावरून पोलिसांनी एकेक धागा जोडून पाहिला.

निशिकांत मुल याने प्रश्नपत्रिका शअर केली होती. त्यात फरहान अख्तर नावाच्या शिक्षकाने प्रश्नपत्रिकेचे उत्तरे शेअर केले. त्यानंतर या प्रकरणात मुस्तफा खान, जुनेद अहमद जावेद शेख, दिनेश शंकर कोटांगळे, मनिष सुदाम शंभरकर, प्रदीप भैय्यालाल जांगडे आणि विद्यासाधना शिक्षण संस्थेचा संचालक संदीप सरटकर याला अटक झाली. यात सरटकर याने शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन १२ वी बोर्टाचे पेपर मिळवले होते. त्यानेच पुढे खासगी शिकवणी वर्गाला हे पेपर विकल्याचेही समोर आले. सरटकरला पेपर पुरवणारे ते बोर्डातील अधिकारी कोण आता याचा पोलिस शोध घेत आहेत. त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.

शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची बदली

बारावीच्या पेपरफुट प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षक संदीप सरटकरने विद्यासाधना कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर शिपायाच्या मदतीने पेपर फोडल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी शिक्षण मंडळाने या केंद्रावर कारवाई करीत, सर्वच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची बदली केल्याची माहिती समोर आली. या सर्वांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे.