सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन वर्षांपूर्वी शहरातील विविध भागात अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली होती, मात्र शहरात अजूनही १२१ अनधिकृत धार्मिक स्थळे असल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे. याचबरोबर, शहरातील किती धार्मिक स्थळे विश्वस्त संस्थांच्या (ट्रस्ट) व महापालिकेच्या आरक्षित जागेवर आहेत, याची माहिती महापालिकेत उपलब्ध नसल्याचे कळवण्यात आले आहे.

न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली होती. त्यावेळी २०० पेक्षा अधिक धार्मिक स्थळे हटवण्यात आली होती. त्याला विविध सामाजिक व धार्मिक संघटनांकडून विरोध झाल्यानंतर कारवाई थंडावली. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती मागितली असता त्यात १२१ स्थळे ही अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. त्यातील अनेक स्थळे वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी आहेत.

नागपूर शहरात परवानगी न घेता किती प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यात आले आहे, याची माहिती महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही. शिवाय, शहरातील किती धार्मिक स्थळे विश्वस्त संस्थांची आहेत व किती नियमित केलेली आहे, याचीही माहिती महापालिका प्रशासनाकडे नाही. धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केव्हा झाले होते व त्याप्रमाणे किती धार्मिक स्थळे दाखवण्यात आली होती, याची संख्येत माहिती देण्यात आली नाही. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर म्हणाले, शहरातील प्रार्थना स्थळांबाबत महापालिका प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, मात्र पूर्ण माहिती मिळाली नाही