नागपूर : शहरातील एका स्वयंसेवी संस्थेशी संबंधित कथित धर्मांतरण आणि आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणाने नव्याने वाद निर्माण केला असून, या संदर्भात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. परदेशातून मिळालेल्या देणग्यांचा वापर नेमका कशासाठी झाला, याचा शोध घेताना दहशतवादविरोधी पथकाच्याही (एटीएस) भुवया उंचावल्या आहेत.
युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटी (युएमएस) आणि ‘फिक्र’ या संस्थांमार्फत सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जात असले तरी, अमेरिकेसह युरोपमधून ‘जकात’च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या निधीचा वापर धर्मांतरणाशी संबंधित कार्यासाठी झाला का, याची चौकशी पोलीस करत आहेत.
दरम्यान, संस्थेत कार्यरत काही महिलांनी मानकापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. संस्थेतील प्रकल्पप्रमुख रियाज काझी याने महिलांवर धार्मिक आचारांचे पालन करण्यासाठी दबाव टाकल्याचा तसेच वैयक्तिक पातळीवर गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नमाज, रोजा, दुवा यांसारख्या प्रथा पाळण्यास भाग पाडले जात होते, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काझीला अटक केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा, तसेच नकार दिल्यानंतर त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोपही आहे. नोकरी सोडल्यानंतरही संबंधित महिलांच्या कुटुंबियांना फोन करून त्यांच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केल्याचेही समोर आले आहे.
युएमएस ही संस्था २०१० पासून कार्यरत असून, सुरुवातीला एचआयव्ही-एड्स क्षेत्रात काम करत होती. २०१८ नंतर आणि विशेषतः कोरोनानंतर संस्थेने ‘फिक्र’ या नावाने नवीन उपक्रम सुरू करत ‘पढे हम पढाए हम’ या योजनेअंतर्गत वंचित मुलांसाठी शिक्षणविषयक काम सुरू केले. मात्र, कार्यपद्धतीत झालेल्या बदलांनंतर संस्थेच्या हालचाली संशयाच्या भोवऱ्यात आल्या आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत एटीएस तसेच विशेष तपास पथक (एसआयटी) यांचेही लक्ष केंद्रीत झाले आहे. संस्थेची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी, आर्थिक लेखापरीक्षण तसेच निधीचा वापर याबाबत सखोल तपास सुरू आहे. यासंदर्भात काही सामाजिक संघटनांनी स्वतंत्र एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, संस्थेच्या संचालक मंडळातील अॅड. सलमान अहमद यांनी आरोप फेटाळून लावत, ही तक्रार शिस्तभंग कारवाईनंतर सूडभावनेतून केल्याचा दावा केला आहे. संबंधित महिलांनी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन केले होते आणि त्यांना नोटीस देण्यात आली होती, असे ते म्हणाले.
गेल्या काही वर्षांत संस्थेतून अनेक महिलांनी नोकरी सोडल्याची बाबही समोर आली असून, त्यांच्या निवृत्तीमागील कारणांची चौकशी पोलीस करत आहेत. या सर्व घडामोडींमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले असून, तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
