नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून होत असलेला ‘खासदार औद्योगिक महोत्सव’ म्हणजेच ‘ॲडव्हांटेज विदर्भ’चे फलक मुख्य प्रवेशदारावर लावण्यात आले. या फलकांमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले यांचेही नाव झाकण्यात आले.

विशेष म्हणजे, कार्यक्रमाला मैदान देताना विद्यापीठाचे स्वरूप असा प्रस्ताव अधिसभेमध्ये मंजूर झाला होता. त्यानंतरही यावर कार्यवाही नसल्याने अधिसभा सदस्य राहुल हनवते यांनी आक्षेप घेतला.

नागपूर विद्यापीच्या नियमानुसार, राजकीय पक्ष वगळता अन्य कार्यक्रमासाठी महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील मैदान दिले जाते. यासाठी आवश्यक दरही ठरवण्यात आले आहे. मात्र, कार्यक्रम घेणाऱ्यांकडून अनेकदा नियमावलीचा भंग होत होता. तसेच विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कार्यक्रमाचे फलक लावताना विद्यापीठाची ओळख असलेले राष्ट्रसंतांचे नावच झाकले जात होते. यामुळे अधिसभा सदस्य राहुल हनतवे यांनी प्रस्ताव मांडला होता. तो प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून ओळख पुसली जाणार नाही, यावर एकमत झाले.

मात्र, असे असतानाही विद्यापीठाच्या मैदानावर ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होऊ घातलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवासाठी फलक लावण्यात आले असून यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव झाकले गेले आहे. यावर हनवते यांनी आक्षेप घेत कुलगुरूंची भेट घेतली. तसेच कार्यवाहीही मागणी केली. मात्र, त्यावर काहीही तोडगा निघाला नाही, असे हनवते यांनी सांगितले.

प्रस्ताव काय आहे?

कार्यक्रमादरम्यान असे दिसून आले की, आयोजक आपले फलक अशा पद्धतीने बांधतात की विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे झाकले जाते. विद्यापीठ जरी आयोजकाला फक्त मैदान उपलब्ध करून देते, तरी आयोजक संपूर्ण विद्यापीठ भाड्याने घेतल्याप्रमाणे वागते. अशाने विद्यापीठाचे अस्तित्व त्यादरम्यान नाहीसे होऊन पूर्णपणे आयोजनाचे मैदान असल्याचे स्वरुप विद्यापीठाला येते. त्यामुळे कुणालाही एखाद्या कार्यक्रमासाठी हे मैदान उपलब्ध करून द्यायचे झाल्यास विद्यापीठाचे स्वरूप कायम राहावे याची दक्षता घेऊन आणि तशा अटी शर्तीवरच मैदान उपलब्ध करावे, असा प्रस्ताव विद्यापीठाने मंजूर केला आहे.

विद्यापीठाने स्वत: माझा प्रस्ताव मंजूर केल्यानंतरही त्यावर आवश्यक ती कार्यवाही होत नाही. विद्यापीठाच्या दोन्ही दारांवर फलक लावण्यात आले. यामुळे राष्ट्रसंतांचे नावही झाकले गेले आहे. – राहुल हनवते, अधिसभा सदस्य.

हनवते यांच्या आक्षेपानंतर मी स्वत: जाऊन प्रवेशद्वाराची पाहणी केली. यावेळी जसा आक्षेप घेतला जातोय तशी परिस्थिती नाही. बाहेरून जरी नाव झाकल्यासारखे दिसत असले तरी आता प्रवेश करताना विद्यापीठ प्रवेशद्वारावर असलेले नाव दिसते. याशिवाय खासदार औद्योगिक महोत्सव विद्यापीठात होत असल्याने अनेक महत्त्वाच्या कंपन्यांसोबत विद्यार्थी हिताचे सामंजस्य करार होणार आहे. त्यामुळे हा सोहळा विद्यापीठासह विद्यार्थ्यांसाठीही फार महत्त्वाचा आहे. – डॉ. मनाली क्षीरसागर, कुलगुरू.