नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा गृह महाविद्यालयात घेतल्या जाणार असून परीक्षेचा खर्च म्हणून विद्यापीठाकडून महाविद्यालयांना प्रतिविद्यार्थी केवळ१० रुपये दिले जाणार आहेत. विद्यापीठाच्या या निर्णयावर महाविद्यालयांनी नाराजी जाहीर केली आहे.

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाईन बहुपर्यायी पद्धतीने गृह महाविद्यालयात होणार आहेत. विद्यापीठाशी ५०७ महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठाकडून सर्व महाविद्यालयांना ऑनलाईन माध्यमातून प्रश्नपत्रिका पुरवल्या जाणार आहेत.

प्रश्नपत्रिकांची छायांकित प्रत महाविद्यालयांना काढावी लागेल. प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ५० प्रश्न विचारले जाणार असल्याने एक प्रश्नपत्रिका किमान पाच ते सहा पृष्ठांची असेल. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिकेची छायांकित प्रत काढण्याकरिता दहा रुपयांपेक्षा अधिकचा खर्च येईल. याशिवाय, परीक्षेदरम्यानचा इतर खर्चही महाविद्यालयांना करावा लागतो.

यामध्ये परीक्षा केंद्रावरील नियंत्रक आणि इतर लोकांनाही मानधन द्यावे लागते. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षेसाठी प्रतिविद्यार्थी देऊ केलेले दहा रुपये फारच कमी असून अधिकचा खर्च प्राचार्यानी आपल्या खिशातून करावा का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  विद्यापीठाने उन्हाळी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून पूर्ण परीक्षा शुल्क वसूल केले आहे. त्यातच, परीक्षा  बहुपर्यायी पद्धतीने होणार असल्याने उत्तरपत्रिकांचा आणि प्रश्नपत्रिकांच्या छायांकित प्रती महाविद्यालयांनाच काढाव्या लागणार आहे. परिणामी, विद्यापीठाचा हा खर्चदेखील वाचला आहे. असे असतानाही महाविद्यालयांना कमी पैसे दिले जाणार असल्याने या निर्णयाला विरोध होत आहे.