नागपूर : देशातील सर्वात मोठा वैज्ञानिक सोहळा असणाऱ्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ची १०८वी परिषद जानेवारी २०२३ दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात होणार आहे. सायन्स काँग्रेसची चमू पुढील आठवड्यात नागपूर विद्यापीठाला भेट देणार आहे. यावेळी  परिषदेची मध्यवर्ती संकल्पना (थीम) ठरवली जाईल.

नागपूर विद्यापीठाचे हे शतकोत्तर वर्ष असून या दरम्यान इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाची संधी मिळणे ही गौरवशाली बाब ठरणार आहे. ‘इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’ने (इस्का) याबाबत अधिकृत निमंत्रण विद्यापीठाला पाठवले आहे. ‘इस्का’तर्फे दरवर्षी देशातील विविध शहरांत ही परिषद आयोजित  केली जाते. १९१४ मध्ये सुरू झालेल्या ‘सायन्स काँग्रेस’च्या इतिहासात प्रथमच ही परिषद नागपूरला होणार असल्याची  माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सायन्स काँग्रेसचे उद्घाटन होणार असून, देश-विदेशातील नामवंत संशोधक, नोबेलविजेते शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित राहतील. देशभरातील सर्व संशोधन संस्थांचे प्रतिनिधी, विविध विज्ञान क्षेत्रातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी सायन्स काँग्रेसमध्ये त्यांच्या क्षेत्रात सध्या सुरू असणाऱ्या संशोधनाचे सादरीकरण करतील. यानिमित्ताने आयोजित होणारे देशातील सर्वांत मोठे विज्ञान प्रदर्शन हे नागपूरकरांसाठी विशेष आकर्षण असेल. नागपूर विद्यापीठानेही आता ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ची तयारी सुरू केली आहे.