नागपूर : ओडिशातील बालासोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निघालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कराटे संघासोबत धावत्या रेल्वेत गैरवर्तणूकीचा प्रकार उघडकीस आला. रविवारी सकाळी हा संघ भवनेश्वर रेल्वे स्थानकावरून फलकनुमा एक्स्पेसने जात असताना रविवारी हा प्रकार घडला.

अशी घडली घटना

नागपूर विद्यापीठाचा मुलींचा कराटे संघ संघ शनिवारी सकाळी ११ वाजता ‘पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस’ने ओडिशाकडे रवाना झाला. त्यांची गाडी रविवारी सकाळी भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांनी पुढील प्रवासासाठी ‘फलकनुमा एक्सप्रेस’ पकडली. प्रवासादरम्यान मुलींसोबत गैरवर्तनाची घटना घडली. विशेष बाब म्हणजे, नागपूर विद्यापीठाने १०-१२ मुलींच्या या संघासोबत एक महिला प्रशिक्षक आणि एक पुरुष प्रशिक्षकही रवाना केले होते. मात्र, हे प्रशिक्षक वेगवेगळ्या बोगींमधील बर्थवर (जागांवर) बसले होते, तर मुली रेल्वेच्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये विखुरलेल्या होत्या. त्यानंतर, रविवारी सकाळी जेव्हा मुलींनी गाडी क्रमांक १२७०४ (फलकनुमा एक्सप्रेस) मधून बालासोरच्या दिशेने प्रवास सुरू केला, तेव्हा त्यांना काही उनाड तरुणांच्या गटाने छेड काढली.

मुलींचा पालकांशी संवाद

या तरुणांनी काही मुलींना अश्लाघ्य शेरेबाजी केली. त्यावेळीही, महिला आणि पुरुष प्रशिक्षक वेगवेगळ्या आसनावर बसलेले होते. काही मुलींनी पालकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती देत या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रिकरण केले. ते कुटुंबाशी शेअर केले. त्यानंतर जेव्हा नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभागाशी या संदर्भात संपर्क साधण्यात आला, तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

मुलींच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष

हा संपूर्ण प्रकारात नागपूर विद्यापीठाने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जी केल्याचे उघड होत आहे. शेवटी अत्यंत हवालदिल मुलींनी रेल्वेतच हंबरडा फोडून आपबिती कथन केली. रेल्वे सुरक्षा दलाला या बाबत दूरध्वनीवरून माहिती दिल्यानंतरही ते त्वरित घटनास्थळी पोहोचले नाहीत. त्यामुळे मुलींच्या पालकांची चिंता वाढली आहे.

शेवटी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी पुढील स्थानकावर उनाड तरुणांना ताब्यात घेत त्यांना रेल्वेतून खाली उतरवले. नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मुली लांबच्या प्रवासाला निघताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस व्यवस्था करण्याची जबाबदारी विद्यापीठाची नाही का? असा थेट प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.