नागपूर : बिबट्याकडून होणाऱ्या वाढत्या हल्ल्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील दोन संशोधकांनी ॲल्युमिनियमचा विशेष पिंजरा तयार केला आहे. यामुळे बिबट्यापासून संरक्षण मिळण्यासोबतच परिसरातील नागरिकांना तात्काळ सतर्क करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

ही नवी यंत्रणा नेमकी काय व कशी काम करते?

विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. अमित रमेश बनसोड यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले. त्यांनी तयार केलेला हा पिंजरा जाळीदार असून तो डोक्यावर घट्ट बांधता येतो. त्याचा उर्वरित भाग पाठीवर दुमडलेल्या स्वरूपात ठेवलेला असतो. बिबट जवळ येताना दिसताच किंवा झडप घालण्याचा धोका निर्माण झाल्यास, पिंजऱ्यावरील हूक ओढल्यावर तो क्षणार्धात संपूर्ण शरीराभोवती पसरतो. त्याचवेळी पिंजऱ्यात बसवण्यात आलेले आठ ध्वनिप्रक्षेपक यंत्र सक्रिय होतात. त्यातून वाचवा-वाचवा, ढोलाचे आवाज, ओरडण्याचे ध्वनी एकाचवेळी प्रसारित होतात. त्यामुळे बिबट घाबरून पळून जाण्याची शक्यता वाढते, तसेच परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा मिळून मदत त्वरेने मिळू शकते. या उपकरणाचे ध्वनिप्रक्षेपक यंत्र सहजपणे घरच्या घरी चार्ज करता येतो.

नाविन्यपूर्ण पिंजरा कायमस्वरुपी उपाय ठरेल का?

विदर्भ तसेच मराठवाड्यात अलीकडे बिबट्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, गावकरी आणि मजूर यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिबट हल्ल्याच्या घटना देखील वाढल्या. जंगल क्षेत्र कमी होणे, उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई यामुळे वन्यप्राणी गावांकडे वळत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम राज्य सरकारने सुरू केली असली तरीही तो कायमस्वरूपी उपाय नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा नाविन्यपूर्ण उपाययोजनांची गरज अधोरेखित होत आहे.

संशोधक काय म्हणतात?

दरम्यान, या ॲल्युमिनियम पिंजऱ्याला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईन नोंदणी प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. या समाजपयोगी संशोधनाबद्दल विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दिया पानेकर यांनी संशोधकांचे अभिनंदन केले. आमच्या डिझाईनला केंद्र सरकारकडून पेटंट मिळाले आहे. हे पिंजरे अजून पूर्णपणे तयार व्हायचे आहेत. ते शेतकरी, गावकरी यांच्यासाठी अतिशय उपयोगाचे ठरतील. पावसाळ्यात जसे डोक्यावर घोंगडे घेतात, तशाच पद्धतीचा हा पिंजरा आहे. त्यामुळे निश्चितच यातून मानव-बिबट संघर्ष कमी होईल, असे संशोधक डॉ. संजय ढोबळे, डॉ. अमित बनसोड यांनी सांगितले.