‘विद्यार्थी संसद’द्वारे विशिष्ट विचारांच्या प्रचाराचे ‘नियोजन’? ; ठरावांबाबत विद्यापीठाकडून कमालीची गुप्तता

या ‘विद्यार्थी संसदे’मध्ये देशभरात वाद निर्माण करणाऱ्या ‘समान नागरी कायद्या’वर विधेयक मांडले जाणार असल्याची माहिती आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘विद्यार्थी संसद’चे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, यातील विषय आणि ठरावाच्या विषयासंदर्भात बाळगण्यात आलेली कमालीची गुप्तता पाहता विद्यार्थी संसदेच्या नावाखाली एक विशिष्ट विचारधारा आणि राजकीय पक्षाच्या प्राधान्यक्रमातील विषयांचाच जागर होईल, असे ‘नियोजन’ केले जात असल्याचा संशय बळावत आहे.

नागपूर विद्यापीठात विशिष्ट विचाराच्या अपात्र अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, कार्यक्रमांचे आयोजन, विभागांचे नामकरण यामुळे मागील वर्षभरापासून शिक्षण सोडून वादग्रस्त विषयांवरून या विद्यापीठावर प्रखर टीका होत आहे. त्यात आता होऊ घातलेल्या ‘विद्यार्थी संसदे’मुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.  वाद उद्भवू नये म्हणून, संसदेमध्ये मांडल्या जाणाऱ्या ठरावांचा विषय गुप्त ठेवण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व आणि नेतृत्वाला चालना देण्यासाठी विद्यापीठाने २९ आणि ३० ऑक्टोबरला  श्रीमंत राजे रघुजी भोसले नगरभवन,  महाल येथे ‘विद्यार्थी संसद’चेआयोजन केले आहे. यासाठी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमधून १०० विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. यात ५५ विद्यार्थी हे सत्तापक्ष तर ५० विद्यार्थी हे विरोधी बाकावर राहणार आहेत. या ‘विद्यार्थी संसदे’मध्ये देशभरात वाद निर्माण करणाऱ्या ‘समान नागरी कायद्या’वर विधेयक मांडले जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, एका विशिष्ट विचारधारेचे समर्थन करणारा आणि भाजपच्या अजेंडय़ावरील प्रमुख असलेला हा विषय ‘विद्यार्थी संसदे’मध्ये  येणार असल्याने विद्यापीठाला यातून  नेमके काय साधायचे आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याशिवाय संसदेच्या दुसऱ्या दिवशी एक ठराव मांडण्यात येणार आहे. मात्र, या ठरावाचा विषय काय, यावर कुणीही माहिती द्यायला तयार नाही. केवळ वर्तमान परिस्थितीला धरून ठराव असल्याचे बोलले जात आहे. ठरावाच्या विषयासंदर्भात बाळगण्यात आलेली गुप्तता बघता कार्यक्रमाआधी वाद टाळता यावा म्हणून ठरावाच्या विषयासंदर्भात गुप्तता बाळगल्याची चर्चा आहे.

नियोजन समितीत अभाविप, भाजयुमोचे कार्यकर्ते

‘विद्यार्थी संसदे’च्या नियोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये अभाविप आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यामध्ये नोंदणी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी ही भाजयुमोच्या डॉ. डिम्पी बजाज यांची निवड केली आहे. तर वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी ही अभाविपचा कार्यकर्ता वैभव बावनकर यांच्याकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वैभव बावनकर यांच्यावर आंदोलनादरम्यान विद्यापीठामध्ये तोडफोड केल्याची पोलीस तक्रारही करण्यात आली होती. याशिवाय आयोजन समितीमधील अन्य सदस्यही याच संघटनांशी जुळलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी संसदेवरून वाद चिघळण्याची दाट शक्यता आहे.

अशी होणार निवड..

‘विद्यार्थी संसदे’साठी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. यासाठी

२१ ते २३ ऑक्टोबपर्यंत भंडारा, गोंदिया, वर्धा आणि नागपूर येथील विद्यार्थ्यांची महिला आरक्षण विधेयक आणि भ्रष्टाचारमुक्त भारत या विषयावर स्वयंस्फूर्त स्पर्धा होणार आहे. यातून १०० उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर २६ आणि २७ ऑक्टोबरला निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल.  २८ ऑक्टोबरला रंगीत तालीम व त्यानंतर २९ व ३० ऑक्टोबर असे दोन दिवस ‘विद्यार्थी संसद’ होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nagpur university organizing student parliament zws

Next Story
‘तो’ पोपट १५ दिवसांपासून वन कोठडीतच
ताज्या बातम्या