विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा लांबणीवर !; ‘एमकेसीएल’चा तांत्रिक गोंधळ कारणीभूत

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अट्टाहासातून ‘एमकेसीएल’ला देण्यात आलेले परीक्षेचे संपूर्ण कामकाज ठप्प पडल्याची माहिती आहे. ‘एमकेसीएल’च्या तांत्रिक गोंधळामुळे महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे ऑनलाईन परीक्षा अर्ज भरणे अडचणीचे जात आहे. यामुळे २५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्याचे निश्चित झाले आहे. यापूर्वी, परीक्षा अर्ज भरण्यासाठी १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

अनेक महाविद्यालयांना अद्यापही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरता आलेले नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी प्राचार्य फोरमने केली होती, हे विशेष. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेचे काम याआधीही ‘एमकेसीएल’ला देण्यात आले होते. मात्र, ‘एमकेसीएल’च्या तांत्रिक गोंधळामुळे माजी कुलगुरू डॉ. काणे यांनी कंपनीसोबतचा करार रद्द केला होता. विद्यापीठाला ‘एमकेसीएल’चा असा कटू अनुभव असतानाही पुन्हा त्याच कंपनीला परीक्षेचे काम देण्यास विद्यापीठ प्रशासनातील प्रत्येकाने विरोध केला होता. मात्र, असे असतानाही कुलगुरू डॉ. चौधरी यांनी मी स्वत: ‘एमकेसीएल’ची जबाबदारी घेत असल्याचे सांगत बेकायदेशीररित्या या कंपनीला काम दिले. मात्र, ‘एमकेसीएल’कडून होणाऱ्या विलंबाचे परिणाम आता विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत.

नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना २५ एप्रिलपासून सुरुवात होणार होती. विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना १५ मार्चपर्यंत अर्ज भरण्यास सांगितले होते. दरम्यान, विद्यापीठाचे संकेतस्थळ सुरू न झाल्याने अर्ज जमा होऊ शकले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने २५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, या अडचणी दूर न झाल्यामुळे परीक्षा अर्ज भरण्याची मुदत अगोदर ३१ मार्च व नंतर ४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. यादरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरले गेले नाहीत. काही विद्यार्थ्यांनी तर परीक्षा शुल्कदेखील जमा

केले नाही. यामुळे परीक्षा पुढे ढकलाव्या, असा सूर काही महाविद्यालयांचा होता. प्राचार्य फोरमनेदेखील यासंदर्भात विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परीक्षा अर्जच वेळेत दाखल झाले नाहीत तर परीक्षा घेणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उन्हाळी परीक्षा ही विद्यापीठ स्तरावर ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण आहे. विद्यापीठामध्ये सध्या दोन कंपन्या परीक्षेचे ऑनलाईन काम बघत आहेत. कुलगुरूंच्या अट्टाहासामुळे या दोन कंपन्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने त्याचा फटका परीक्षेच्या कामाला बसत असल्याची माहिती आहे.