नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये १०२ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा महिला कुलगुरू मिळाल्या. त्यांच्या नियुक्तीला तीन महिने झाले. मात्र, त्यांच्या पूर्ण कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रीय काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआयने शुक्रवारी एक अनोख्या पद्धतीचे आंदोलन केले. यावेळी चक्क कुलगुरूंच्या कक्षा बाहेर असलेल्या नावाच्या पाटीला बाहुली लावली. तसेच कुलगुरू कठपुतळी असल्याचा आरोप केला. या आंदोलनामुळे वादाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक शुक्रवार ६ मार्चला सकाळी ११ वाजता सुरू झाली. विशेष म्हणजे विद्यापीठाचा अर्थसंकल्प या बैठकीत सादर करण्यात येणार असून ३५० कोटींहून अधिक रुपयांचा तो राहणार असल्याची माहिती आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना नवीन काय मिळते?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरवर्षी मार्च महिन्यात होणारी अधिसभेची बैठक विद्यापीठाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. यामध्ये विद्यापीठाच्या विविध विकास कामांसह परीक्षा विभागातील सुधारणा, नवीन बांधकाम, तांत्रिक सुविधा आणि विद्यार्थी हिताच्या काही योजनांचा समावेश असतो.

दीड महिन्यानंतरही ५०० परीक्षांचे निकाल प्रलंबित

मागील काही वर्षात नवीन घोषणा न झाल्याने अनेकदा विद्यापीठावर टीकाही झाली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन काहीतरी मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय अधिसभा सदस्यांकडून विविध प्रस्तावही सादर केले जाते. मात्र शुक्रवारी अधिसभेत बैठकीत चर्चा सुरू होण्यापूर्वी मोठे आंदोलन झाले. आंदोलकांनी चक्क कुलगुरूंच्या कक्षा बाहेर असलेल्या नावाच्या पाटीला बाहुली लावली. तसेच कुलगुरू कठपुतळी असल्याचा आरोप केला. ५०० परीक्षांचे निकाल ४५ दिवस पूर्ण होऊनही जाहीर न झाल्यामुळे ही आंदोलन करण्यात आले.

चौकशीचं आश्वासन देऊनही पूर्तता नाही

एनएसयूआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील बैठका, पत्रव्यवहार आणि चर्चेत कुलगुरू मनाली क्षीरसागर यांना परीक्षा विभागाबाबत असंख्य माहिती देऊनही कोणताही योग्य निर्णय घेण्यात आलेला नाही. विभागातील अनियमिततेसाठी जबाबदार असलेल्या कोएम्प्ट एडु टेक प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध चौकशी समिती स्थापन केली जाईल असे आश्वासन स्वतः कुलगुरूंनी एनएसयूआयच्या अधिकाऱ्यांना दिले होते. तरीही, काही महिने उलटूनही कोणतीही समिती स्थापन झालेली नाही. यावरून हे स्पष्ट होते की, कुलगुरू विद्यापीठात भीतीच्या वातावरणात काम करत आहेत आणि निर्णय घेण्यास असमर्थ आहेत.

तीन महिन्यापासून प्र- कुलगुरू निवड नाही

कुलगुरूपदावर रूजू होण्यापूर्वीपासून नागपूर विद्यापीठात मोठे राजकारण आहे असे अनेक लोक सांगायचे. पण, मी त्या राजकारणाचा भाग नाही आणि अशा राजकारणाला घाबरण्याचे काही कारण नाही. विद्यार्थी हे केंद्रबिंदू असल्याने मी असल्या राजकारणाला कधीही घाबरत नाही, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी व्यक्त केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डाॅ. मनाली क्षीरसागर यांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडत नाही आणि विद्यापीठातील राजकारणाला घाबरत नाही असे जाहीर सभेत सांगितले. मात्र, असे असतानाही त्यांना नियुक्तीला दीड महिना उलटल्यावरही विद्यापीठातील प्र-कुलगुरू निवडीचे घोडे कुठले अडले? अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगली आहे.