नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या महिला कराटे खेळाडूंशी रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या छेडछाडीच्या घटनेविरोधात नागपूरमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. फलकनुमा एक्स्प्रेसमध्ये काही तरुणांनी खेळाडू मुलींवर अश्लील टिप्पणी आणि वर्तन केल्याचा आरोप असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयात धडक देत निषेध नोंदवला. महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित करत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

रेल्वेत छेडछाडीची घटना

ओडिशातील बालासोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नागपूर विद्यापीठाच्या १० ते १२ महिला कराटे खेळाडू रवाना झाल्या होत्या. रविवारी सकाळी भुवनेश्वरहून फलकनुमा एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत असताना काही तरुणांनी त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी व गैरवर्तन केल्याची घटना घडली.

भीतीतून व्हिडिओ पाठवला

घटनेनंतर घाबरलेल्या मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मोबाईलवर व्हिडिओ तयार करून तो आपल्या पालकांना पाठवला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि रेल्वेतील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

प्रशिक्षक वेगळ्या डब्यात

विद्यापीठ प्रशासनाच्या नियोजनाअभावी संघातील प्रशिक्षक दुसऱ्या बोगीत होते, तर खेळाडू मुली वेगवेगळ्या डब्यांमध्ये होत्या. या परिस्थितीचा फायदा घेत काही तरुणांनी मुलींना त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला.

भाजप युवा मोर्चाचा निषेध

या घटनेच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेत निवेदन दिले. शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या सूचनेनुसार आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध नोंदवण्यात आला.

चार प्रमुख मागण्या

आंदोलनकर्त्यांनी दोषींवर कठोर गुन्हे दाखल करणे, पालकांनी आरपीएफला माहिती दिल्यानंतरही प्रतिसाद न देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे, क्रीडा संघांना विशेष सुरक्षा देणे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये पोलिस गस्त वाढवण्याच्या मागण्या केल्या.

आंदोलनाचा इशारा

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना तातडीने न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला.निवेदन देताना रितेश पांडे, रिशभ अरखेल, विक्की पांडे, उदय मिश्रा, अक्षय शर्मा, अथर्व त्रिवेदी, सुमित पडोळे, येजाज शेख, तुषार ठाकरे, प्रवीण श्रीवास, जय साजवानी, आशिष तिवारी, युवती प्रमुख प्रशंसा भोयर, श्रद्धा डवले, मीनल गेहलोत, पल्लवी गिल्लोरे चोरसिया, अमन गुप्ता, दीपक पांडे, सोमेश गोर, निलेश भिवसनकर, मनीष वर्मा यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.