नागपूर : पूर्व नागपुरातील वर्धमाननगर भागात स्मॉल फॅक्टरी भागात रविवारी सकाळी भीषण आग लागली. यात ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी उभारलेल्या चार शेड्सना आग लागली. आगीचे लोळ दुरूनच दिसत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली. सुमारे आठ अग्निशमन बंबाकडून आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहे.

शहरातील वर्धमाननगर परिसराती स्मॉलफॅक्टरी एरियामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट कंपन्या आहे. त्यात ट्रक व इतरा वाहने ठेवण्यासाठी काही शेड्स उभारले आहेत. हे शेड्स प्लास्टिकचे आहेत. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका शेडला आग लागली. प्लास्टिक ज्वलनशील असल्याने काही वेळातच आगीने बाजूचे शेड्सही कवेत घेतले. त्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. येथील काही लोकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाचे जवान ८ बंबासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान चार शेड्सना आग लागल्याची माहिती डीसीपी राहुल मदने यांनी दिली आहे. या शेड्समध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, टायर्स, आईस कॅन – ड्रम आणि फर्निचरसारखे साहित्य असल्याने आगीतून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले आहे.

शेड्स अनधिकृत?

स्मॉल फॅक्टरी परिसरातील हे शेड्स अधिकृत आहेत की अनधिकृतपणे उभारण्यात आले आहेत, याचाही तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या शेड्ससाठी महानगरपालिकेची परवानगी घेण्यात आली होती का, तसेच त्यांना अग्निशमन विभागाची फायर एनओसी होती का, याचीही तपासणी महानगरपालिका, अग्निशमन विभाग आणि नागपूर पोलीस करणार आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती डीसीपी राहुल मदने यांनी दिली आहे.

आठवड्यातील दुसरी घटना

मागील रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी शहरातील वर्दळीच्या सेंट्रल एव्हेन्यू व व्यापारी परिसर असलेल्या गितांजली टॉकीजजवळील फ्रिजच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीने दोन घरेही कवेत घेतली होती. फ्रिजच्या कॉम्प्रेसरमधील वायू व इतर ज्वलनशील वस्तुंमुळे आगीने रौद्र रुप धारण केले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी दुकानदार व दोन घरांतील साहित्य जळाले होते. आगीचा फटका शेजारीच राहणारे रमेश बाभळा व मनोज श्रीवास यांच्याही घराला बसला. यांच्या घरांनाही आगीने कवेत घेतले होते. परंतु आगीचे रौद्ररुप बघता सर्व कुटुंबीय घराबाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला होता.