नागपूर: विदर्भ भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्या मान्य करण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याने संघटनेने संप स्थगित करण्याचे जाहीर केले आहे.
आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेने अमरावती व नागपूर विभागात २६ मे पासून बेमुदत संप सुरू केला होता. त्याची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींना ४ जून रोजी मंत्रालयात चर्चेसाठी बोलावले होते. बैठकीला राज्याचे जमाबंदी आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे हे पुण्यावरून ऑनलाईन उपस्थित होते. संघटनेने सादर केलेल्या मागण्यांपैकी सर्वात महत्त्वाची म्हणजे तांत्रिक कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी मिळावी ही होती. ही मागणी मान्य करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
कर्मचाऱ्यांचा नवीन आकृतिबंध
विभागात सुमारे१५०० पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. त्यानंतरही खात्यामार्फत गेल्या दोन वर्षापासून स्वामित्व योजनेद्वारे राज्यातील सुमारे ४८ हजार गावांतील मालमत्तांची ड्रोनद्वारे मोजणी करून अभिलेख तयार केले. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. त्यावर बावनकुळे यांनी सुधारित आकृतिबंध निर्माण करण्यास जमाबंदी आयुक्तांना निर्देश दिले.
राजपत्रित वर्ग २ च्या कर्मचाऱ्यांना दिलासा
राजपत्रित वर्ग दोनची सुमारे १५० पदे रिक्त असून पदोन्नतीची फाईल मंत्रालयात प्रलंबित आहे. राजपत्रित अधिकाऱ्यांच्या तातडीने पदोन्नत्या करण्याच्या सूचना बावनकुळे यांनी दिल्या. पदसमूह चारमधील सर्व्हे कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीसह पदसमूह तीनमधील निमतानदार, परीरक्षण भूमापक, तसेच पदसमूहात दोनमध्ये शिरस्तेदार त्यांना सुधारित दारिद्र्यतनश्रेणीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जमाबंदी आयुक्तांना दिल्या. यासोबतच मोजणी कर्मचाऱ्यांना मोजणीकरिता १२०० रोवर आणि तेवढेच लॅपटॉप खरेदी करण्याकरिता टेंडर काढण्याच्या सूचना बावनकुळे यांनी दिल्या.
गट ‘क’ मध्ये पाच वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना परीक्षेच्या संधी देऊन पास होणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता काही प्रमाणात पदोन्नती देण्यासंबंधाने सुद्धा कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
विभागातील कर्मचाऱ्यांनी १५ मे पासून तर विदर्भ भूमिलेख कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली विदर्भात २६ मे पासून बेमुदत संप झाला बैठकीत चर्चा झालेल्या पाच मागण्यांवर राज्य सरकार हे १५० दिवसांच्या गतिमान कार्यक्रमात कार्यवाही करेल असे आश्वासन दिले. त्यानंतर संघटनेने संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आश्वासनाची पूर्तता वेळत न झाल्यास नाईलाजाने पुन्हा संप करावा लागेल, असा इशारा विदर्भ भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीराम खिरेकर यांनी दिला.