नागपूर : कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी आपल्या साथीदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या अंगावर धावून जात त्यांच्यावर शाईफेक केली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. या घटनेनंतर आजही माझ्या जिवाला धोका असून संघाशी निगडित लोकांकडून सतत धमक्या येत असल्याचा आरोप विलास लवांडे यांनी नागपुरात केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी रविवारी नागपुरात प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेत सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात बेरोजगारी, महागाई, गुन्हेगारी वाढली आहे. या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडून हिंदू-मुस्लिम किंवा ओबीसी-मराठा वाद वाढविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मला नोटीस न देता बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली. परंतु मला अडवून शाईफेक करणाऱ्यांवर काहीही कारवाई झाली नाही. मी मुख्यमंत्र्यांना दोन वेळा निवेदन दिले, त्याचे अजून उत्तर नाही, साधी दखल पण घेतली नाही. कदाचित माझ्या मृत्यूची वाट पहिली जात असेल, असेही विकास लवांडे म्हणाले. माझ्यावर झालेला हल्ला हा भाजप पुरस्कृत हल्ला होता.
तर संग्राम भंडारी हा वारकऱ्यांचा वेशातील गुंड आहे, त्याच्या पाठीशी मंत्री नितेश राणे आहे. याशिवाय आणखी भाजप पुरस्कृत लोकही आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित संघटनांमध्ये तरुणांची भरती करून त्यांची माथी भडकावत मुस्लिम शत्रू असल्याचे सांगितले जाते. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील सहिष्णुतेबद्दल विचार मांडले. तेच मी सविस्तरपणे मांडले होते. यावरून माझ्यावर कारवाई करण्यात आली. माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पोलिसांत तक्रार करीत मला संरक्षण देण्याची मागणी केली. परंतु मला संरक्षण देण्यात आले नाही, असेही ते म्हणाले. वाघोली पोलिसांनी माझ्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहे असे मी न्यायालयात सांगितले. मला न्यायालय परिसरातच अटक करण्यात आली. न्यायालयाने मला जामीन मंजूर केला. पोलिस व वकिलांनीही चूक झाल्याचे कबूल केले. येरवडा कारागृहात असताना मला चांगली वागणूक देण्यात आली. येथील पोलिसांनाही माझी भूमिका पटली होती, असेही ते म्हणाले. न्याय व्यवस्थेवर माझा भरवसा असून शेवटपर्यंत न्याय मिळविण्यासाठी लढत राहणार, माझा जीव गेला तरी मी थांबणार नाही, असे ते म्हणाले.
केवळ भाजप व संघाच्या लोकांकडून महापुरुषांचा अपमान
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणारी वक्तवे भाजप आणि संघा प्रणित लोकांचेच असा आरोप लवांडे यांनी केला. मी वारकरी घराण्यातील आहे, मी प्रवचन करतो. आता वारकरी संप्रदाय पळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुषार भोसले नावाच्या व्यक्तीने वारकरी संप्रदाय आघाडी तयार केली आहे. यापूर्वी वारकरी संप्रदायमध्ये कुठलीही आघाडी नव्हती. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्र धर्म असून हा विचार टिकला पाहिजे, असे ते म्हणाले.
