नागपूर : नवी दिल्लीतील इंडिया मोबाइल काँग्रेस २०२५ या भव्य सोहळ्यात नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेने (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) भारताच्या पुढील पिढीतील दूरसंचार नवकल्पनांचा डंका वाजवला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी व्हीएनआयटीचे प्राध्यापक डॉ. प्रभातकुमार शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर भारतात विकसित केलेल्या अत्याधुनिक ६जी तंत्रज्ञान नवकल्पना सादर केल्या. ही घटना देशाच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल मानली जात आहे.

डॉ. शर्मा हे व्हीएनआयटीमधून उदयास आलेल्या ‘सर्वक्ष कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ या स्टार्टअपचे संस्थापक असून, त्यांनी भारताच्या ६जी स्टार्टअप कन्सोर्टियमअंतर्गत विकसित उपाय सादर केले. या सत्रात दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, सचिव डॉ. नीरज मित्तल, तसेच आकाश अंबानी, सुनील भारती मित्तल आणि कुमारमंगलम बिर्ला यांसारखे दिग्गज उपस्थित होते. त्यामुळे अकादमिक क्षेत्र, उद्योग आणि सरकार यांचा एकत्रित नवोन्मेषी दृष्टिकोन या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आला.

सर्वक्ष स्टार्टअप, ज्याची सह-संस्थापक डॉ. अनामिका सिंह आणि चंद्रेश धोते आहेत, हे रीकॉन्फिगरेबल इंटेलिजंट सर्फेस (RIS) या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करत आहे. हे तंत्रज्ञान ६जी नेटवर्कमध्ये वायरलेस सिग्नल्सना गतिमानपणे दिशा देऊन अधिक चांगले कव्हरेज, कमी हस्तक्षेप आणि वाढीव डेटा सुरक्षा प्रदान करते. या संशोधनामुळे भविष्यात ग्रामीण आणि दुर्गम भागांतील नेटवर्क क्षमता वाढविणे शक्य होईल.

सर्वक्ष कंपनीला दूरसंचार विभाग (DoT) आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) यांचे सहकार्य मिळाले असून, ती मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, महू यांच्या भागीदारीत संरक्षण आणि नागरी वापरासाठी स्वदेशी “वायरलेस बबल” प्रणाली विकसित करत आहे. ही प्रणाली युद्धस्थिती, आपत्कालीन सेवा आणि संवेदनशील क्षेत्रांमध्ये सुरक्षित व विश्वसनीय संप्रेषणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

व्हीएनआयटीचे संचालक प्रा. (डॉ.) पी. एल. पटेल यांनी डॉ. शर्मा आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करताना म्हटले की, “६जी क्षेत्रातील हे संशोधन व्हीएनआयटीच्या सामाजिकदृष्ट्या परिणामकारक आणि उद्योगाभिमुख संशोधन धोरणाचे उत्तम उदाहरण आहे.”

उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या प्रगतीचा गौरव करत सांगितले की, “भारत आता फक्त दूरसंचार तंत्रज्ञानाचा ग्राहक नसून, मेक इन इंडिया’च्या माध्यमातून ४जी आणि ५जी तंत्रज्ञान निर्यात करणारा देश बनला आहे. ६जी मानकीकरण आणि स्वदेशी उत्पादन विकासामध्ये भारत जागतिक नेतृत्व करेल,” असे ते म्हणाले.

या सादरीकरणामुळे नागपूरच्या व्हीएनआयटीने भारताच्या ६जी युगातील नवोन्मेषी नेतृत्वाचा ध्वज फडकावला आहे.