नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे पुणे, पालघर, नालासोपारा, शिरूर आणि नंदुरबार येथील मतदार याद्यांमध्ये समाविष्ट झाल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी केला. आठ मतदार आणि संबंधित कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर करून त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांना राजकीय संन्यासाचे आव्हान दिले.

पुरावे सादर; तिवारींना आव्हान

नागपुरातील मतदारांची नावे परस्पर राज्यातील अन्य शहरांच्या मतदार यादीत समाविष्ट केली जात असल्याचा आरोप गुडधे यांनी यापूर्वी केला होता. भाजपने नियुक्त केलेल्या खासगी कंपनीतील व्यक्तींकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून हा प्रकार केला जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. तिवारी यांनी हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगत गुडधे यांनी पुरावे सादर करावेत; अन्यथा राजकारणातून संन्यास घ्यावा, असे आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर गुडधे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आठ मतदारांची नावे, त्यांच्या मतदार यादीतील नोंदी आणि संबंधित कागदपत्रे सादर केली. या मतदारांना त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थितही केले. संबंधित आठही मतदार दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील रहिवासी असल्याचा दावा त्यांनी केला.

फॉर्म क्रमांक ८ च्या गैरवापराचा आरोप

२०२४ मध्ये संबंधित मतदारांची नावे दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील मतदार यादीत होती. मात्र, २०२६ मध्ये त्यांची नावे राज्यातील अन्य मतदारसंघांमध्ये आढळल्याचा दावा गुडधे यांनी केला. शीला शरद पाटील यांचे नाव शहादा (नंदुरबार), मैरी जेविएर जॉर्ज व पिटर जेविएर जॉर्ज यांची नावे पिंपरी-मावळ (पुणे), तर खान इश्तियाक बदरुद्दीन, वहाब शेख, अशफाक बहाब शेख आणि सैफुद्दीन खान यांची नावे नालासोपारा (पालघर) येथील मतदार यादीत असल्याचे त्यांनी सांगितले. फॉर्म क्रमांक ८ चा गैरवापर करून हे स्थलांतर करण्यात आल्याचा आरोपही गुडधे यांनी केला. संबंधित मतदारांनी फॉर्म क्रमांक ८ भरलेला नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच हे सर्व मतदार अद्याप नागपुरातच वास्तव्यास असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘शब्दाचे पक्के आहेत, संन्यास घेतील’

संबंधित प्रकारात किमान १५ ते २० मतदारांचे अन्य मतदारसंघांत स्थलांतर झाल्याचा आरोप गुडधे यांनी केला. संबंधित मतदारांमध्ये मुस्लिम, अनुसूचित जाती, ख्रिश्चन आणि ओबीसी समाजातील व्यक्तींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. ‘दयाशंकर तिवारी शब्दाचे पक्के आहेत. त्यामुळे आता ते राजकारणातून संन्यास घेतील,’ असे म्हणत गुडधे यांनी तिवारी यांच्यावर उपहासात्मक टीका केली.

‘महापालिकेत कोणत्या अधिकारात बैठका?’

महापालिकेत कोणतेही अधिकृत पद नसताना दयाशंकर तिवारी कोणत्या अधिकारात बैठका घेत आहेत, असा सवालही गुडधे यांनी उपस्थित केला. नगरसेवकांना सल्ला द्यायचा असल्यास तिवारी यांनी नामनिर्देशित सदस्य म्हणून महापालिकेत यावे, असे ते म्हणाले. तिवारी यांनी अलीकडे आरोग्य समितीची बैठक घेतली होती. तसेच नदी-नाल्यांच्या सफाईबाबत प्रशासनाला निर्देश दिल्याचा दावाही गुडधे यांनी केला.