नागपूर : मतदार याद्यांमधील दुबार, मृत तसेच स्थलांतरित मतदारांच्या नोंदी शोधून ती वगळण्यासाठी विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) सुरू असतानाच दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादीत एकाच व्यक्तीच्या नावाची नोंद दोन ठिकाणी आढळल्याने दुबार नोंदी शोधण्याच्या प्रक्रियेच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाकडून एसआयआर प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यात मतदारांच्या नोंदींची पडताळणी करून दुबार नावे, मृत व्यक्तींच्या नोंदी तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या नोंदी शोधून त्या वगळण्याची कार्यवाही केली जात आहे. मात्र, याच प्रक्रियेशी संबंधित यादीत एकाच व्यक्तीची दोनदा नोंद आढळल्याने पडताळणीच्या पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
एका व्यक्तीचे दोन मतदान केंद्रावर नाव
दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील एका नागरिकाच्या नावाची नोंद दोनदा आढळली आहे. दोन्ही ठिकाणी नावाचे स्पेलिंग एकसारखे असून, उपलब्ध तपशीलांमधील साम्यामुळे या नोंदी एकाच व्यक्तीच्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका नोंदीमध्ये जनता हायस्कूल, वर्धा रोड, नागपूर येथील मतदान केंद्र, तर दुसऱ्या नोंदीमध्ये रामदासपेठेतील सोमलवार हायस्कूल येथील मतदान केंद्र नमूद करण्यात आले आहे.
दुबार नोंदी शोधून त्या वगळण्यासाठी विशेष सखोल पुनरावलोकन सुरू असतानाच संबंधित यादीत अशी पुनरावृत्ती कशी राहिली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रत्येक मतदाराची नोंद तपासली जात असल्याचे सांगण्यात येत असताना एकाच व्यक्तीच्या दोन नोंदी आढळल्याने प्रत्यक्ष पडताळणीची कार्यपद्धती आणि तिच्या परिणामकारकतेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
संगणकीकृत यंत्रणेतूनही दुबार नोंदींची तपासणी
दुबार मतदार नोंदी शोधण्यासाठी निवडणूक आयोगाकडून संगणकीकृत यंत्रणेचा वापर केला जातो. संभाव्य दुबार नोंदी शोधताना केवळ नावाच्या अक्षररचनेवर अवलंबून न राहता नाव, वय, पत्ता, छायाचित्र आणि अन्य उपलब्ध तपशीलांचा आधार घेतला जातो. एकाच मतदान केंद्राच्या भागात, विधानसभा मतदारसंघात किंवा वेगवेगळ्या मतदारसंघांत एकाच व्यक्तीची नोंद आहे का, याचीही तपासणी करता येते. छायाचित्रांमधील साधर्म्याच्या आधारे संभाव्य दुबार नोंदी शोधण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे एसआयआर आणि संगणकीकृत तपासणी सुरू असतानाही एकाच व्यक्तीच्या दोन नोंदी आढळल्याने संबंधित नोंदींची पडताळणी नेमकी कशी झाली, तसेच ही संभाव्य दुबार नोंद यंत्रणेच्या निदर्शनास का आली नाही, याबाबत स्पष्टीकरणाची मागणी होत आहे.
अधिकारी म्हणतात ‘एखाद-दुसरी चूक होऊ शकते’
नागपूरच्या उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्चना इंदूरकर यांनी सांगितले की, एसआयआर ही मतदार यादीतील नोंदी दुरुस्त करण्याची प्रक्रिया आहे. लाखो मतदारांच्या नोंदी तपासताना एखाद-दुसरी चूक राहू शकते. दुबार नोंद आढळल्यास संबंधित मतदारांनी बीएलओकडे जाऊन अतिरिक्त नोंद वगळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून घ्यावी.
