नागपूर : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या मॅपिंग प्रक्रियेत सातत्याने तांत्रिक त्रुटी समोर येत आहेत. यामुळे बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) संभ्रमात सापडले असून, मतदार पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया संथ झाली आहे.
‘सेल्फ मॅपिंग’ काही तासांनंतर ‘अनमॅप’
एसआयआर प्रक्रियेत २००२ च्या मतदार यादीतील नोंदींशी सध्याच्या मतदारांची जुळवणी करून मतदारांची माहिती अद्ययावत केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात मॅपिंग प्रक्रियेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे बीएलओंकडून सांगण्यात आले. यापूर्वी यशस्वीरीत्या पूर्ण झालेले ‘सेल्फ मॅपिंग’ काही तासांनंतर ‘अनमॅप’ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आधी पूर्ण केलेली प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागत असल्याने कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे.
एका कुटुंबातील मतदारांची नावे दुसऱ्याच कुटुंबाशी जोडली
काही प्रकरणांमध्ये एका कुटुंबातील मतदारांची नावे दुसऱ्याच कुटुंबाशी जोडली गेल्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत. अशा चुकीच्या मॅपिंगमुळे संबंधित मतदारांच्या नोंदींची पुन्हा तपासणी करून दुरुस्ती करावी लागत आहे. याशिवाय काही मतदारांची माहिती शोधताना ‘नो प्रोजनी डिटेल्स फाउंड’ असा संदेश ॲपमध्ये दिसत असल्याने मागील पुनरीक्षणातील नोंदी शोधून माहिती पुन्हा भरावी लागत आहे.
एका नावाशी संबंधित तब्बल २५ ते ३० नोंदी
एका बीएलओंनी दिलेल्या माहितीनुसार एका नावाशी संबंधित तब्बल २५ ते ३० नोंदी प्रणालीमध्ये दिसत असल्याने त्यातून योग्य नोंद शोधण्यासाठी बराच वेळ खर्ची पडत आहे. काही मतदारांची नावे शोधातच उपलब्ध होत नसल्याने अर्ज प्रक्रिया अधिकच संथ होत आहे. परिणामी प्रत्यक्ष घरभेटी, पडताळणी आणि नोंदणीच्या कामावर परिणाम होत असल्याचे संबंधितांनी सांगितले.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या तांत्रिक पथकाने मॅपिंगची माहिती न दिसण्यासंदर्भातील तांत्रिक अडचण पुढील सात ते आठ तासांत दूर करण्यात येईल, असा संदेश संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ही समस्या तात्पुरती असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्ष क्षेत्रातील अडचणी अद्याप कायम असल्याचे बीएलओंचे म्हणणे आहे.
एसआयआर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी एसआयआर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संपूर्ण प्रक्रिया संदिग्ध ठेवून त्यानुसारच सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे काय, असा सवाल त्यांनी केला. मॅपिंग झालेल्या मतदारांची नावे अनमॅप दाखवली जात असून, एका कुटुंबाचे दुसऱ्या कुटुंबाशी चुकीचे मॅपिंग होत असल्याचा दावा त्यांनी केला. या त्रुटींमुळे मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
