नागपूर : भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) चा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या राज्यात ही प्रक्रिया राबवण्यात आली तिथे लाखो मतदारांची नावे यादीतून कमी करण्यात आली. त्यामुळे आपलेही नाव कमी होण्याची भीती नागरिकांना आहे.

संगणकीय नोंदही नाही

दुसरीकडे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) कामकाजातील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. प्रक्रिया सुरू होऊन दहा दिवस उलटले तरी ५४ बीएलओंनी एकाही मतदाराला नोंदणीसाठीचा अर्ज (एन्युमरेशन फॉर्म) वितरित केला नसल्याचे उघड झाले आहे. तर १,५५९ बीएलओंनी मतदारांकडून संकलित केलेली माहिती संगणक प्रणालीत नोंदवलीच नसल्याचे प्रशासनाच्या पाहणीत आढळले. त्यामुळे संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नागपूर जिल्ह्यातील स्थिती

नागपूर जिल्ह्यात एकूण ४६ लाख ३८ हजार ५८९ मतदार आहेत. एसआयआरच्या कामासाठी ४ हजार ६१० बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. एसआयआर मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान बीएलओंना प्रत्येक घरी जाऊन मतदारांकडून नाव नोंदणीचा अर्ज भरून घ्यायचा आहे. ही प्रक्रिया सुरू होऊन आठ दिवसांचा काळ होत आहे. परंतु बीएलओ मतदारांच्या घरीच जात नसल्याचे चित्र आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर काम न करणाऱ्यांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून गोळा करण्यात आली.

कारणे दाखवा नोटीस

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ५४ बीएलओंनी एकाही मतदाराला अर्ज नमुना दिला नाही. तर १५५९ बीएलओंनी घेतलेली माहिती संगणकीकृत केली नाही. आता या बीएलओंना संबंधित विभागाप्रमुखांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

प्रशासनाकडूनही जनजागृती नाही

एसआयआरची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. पात्र मतदाराचे नाव वगळले गेल्यास त्याला मतदानापासूनच वंचित राहावे लागेल. ही प्रक्रिया सुरू करण्याबाबत आणि नाव नोंदणीबाबत प्रशासनाकडूनही पाहिजे तशी जनजागृती होताना दिसत नाही. जनजागृती करण्यास प्रशासन कमी पडत असल्याची टीका सामान्य नागरिकांकडून होत आहे.

अर्ज वाटप न करणाऱ्या बीएलओंची संख्या

तालुका संख्या

हिंगणा ४

दक्षिण नागपूर १७

मध्य नागपूर १

पश्चिम नागपूर ८

उत्तर १६

कामठी ८