नागपूर : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रियाची भारत निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना घरोघरी जाऊन मतदारांकडून मतदार नोंदणी अर्जनमुना भरून घ्यायचा आहे. वेळेत हे काम न झाल्यास मतदाराचे नाव यादीतून वगळण्याची भीती आहे. परंतु बीएलओंकडून कामात हलगर्जीपणा करण्यात येत असून मतदारांच्या घरीच जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता अशा बीएलओंविरोधक कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. काम न करणाऱ्या दोन बीएलओंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रियाची भारत निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. ही प्रक्रिया पार पडलेल्या राज्याच्या अनुभव लक्षात घेता नागरिकांमध्ये यावरून भीतीचे वातावरण आहे. मतदार यादीतून नावे कमी होण्याची भीती आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) योग्य प्रकारे काम करण्यात येत नसल्याने नाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने काम न करणाऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

एसआयआरची प्रक्रिया सुरू होऊन आज जवळपास दहा दिवसांचा कालावधी होत असताना जिल्ह्यात ५४ बीएलओंनी एकाही मतदाराला नाव नोंदणी संदर्भातील अर्ज नमुना दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. काम न करणाऱ्या बीएलओंना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला.

जिल्ह्यात ४,६१० बीएलओ

नागपूर जिल्ह्यात एकूण ४६ लाख ३८ हजार ५८९ मतदार आहेत. एसआयआरच्या कामासाठी ४ हजार ६१० बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. एसआयआर मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान बीएलओंना प्रत्येक घरी जाऊन मतदारांकडून नाव नोंदणीचा अर्ज (एन्युमरेशन फॉर्म) भरून घ्यायचा आहे. ही प्रक्रिया सुरू होऊन आज दहा दिवसांचा काळ होत आहे. परंतु बीएलओ मतदारांच्या घरीच जात नसल्याचे चित्र आहे. काम न करणाऱ्यांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून गोळा करण्यात आली.

जिल्ह्यातील ५४ बीएलओंनी एकही मतदारास अर्ज नमुना दिला नाही. तर १५५९ बीएलओंनी घेतलेली माहिती संगणीकृत केली नाही. या बीएलओंना संबंधित विभागाप्रमुखांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे.

दोन अंगणवाडी सेविकांविरोधात गुन्हा दाखल

बीएलओची जबाबदारी शिक्षक, कर निरीक्षक, लिपीक, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स व इतर काही विभागातील कर्मचाऱ्यांकडे
सोपविण्यात आली आहे. त्यांना आपले काम करून ही जबाबदारी पूर्ण करायची आहे. परंतु काहींकडून कामच होत नसल्याचे दिसते. त्यामुळे प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे. हिंगणा विधानसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या डवलामेटी येथील मतदार केंद्रावरील दोन बीएलओंविरोधात वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही बीएलओ अंगणवाडी सेविका आहेत.