नागपूर : मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १४ लाख ४३ हजार ५११ मतदारांची नावे वगळण्यात आली असून ८ लाख ६५ हजार ८८६ मतदारांना सुनावणीसाठी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत एसआयआर मोहीम राबवण्यात आली. त्यात ३१ लाख ९५ हजार ०७८ मतदारांनी नोंदणी अर्ज भरून दिले. १४ लाख ४३ हजार ५११ मतदार मिळाले नाहीत. यात ५ लाख ४५ हजार ६४७ गैरहजर, ५,२९ लाख ९५४ हजार स्थलांतरित, २ लाख ४० हजार ३२७ मृत, तर १ लाख १८ हजार ०९९ अन्यत्र नोंदणी किंवा दुबार मतदार आहेत. तर ९,४८४ मतदारांनी माहितीच दिली नाही. ४ लाख १८ हजार ०१२ मतदारांचे २००२ च्या यादीसोबत मॅपिंग झाले नसून, ४ लाख ४७ हजार ८७४ मतदारांच्या नावात, आडनावात किंवा वयात फरक आहे.
४३१ एईआरओ घेणार सुनावणी
२००२ च्या मतदार यादीसोबत मॅपिंग न झालेले किंवा नाव, आडनाव आदीमध्ये फरक असलेले असे एकूण ८ लाख ६५ हजार ८८६ मतदार आढळून आले आहेत. या सर्व मतदारांना येत्या दोन-तीन दिवसामध्ये मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे आणि प्रत्यक्ष घरी नेऊन नोटीस देण्यात येणार आहे. त्याची पोचपावतीही बीएलओंना घ्यावी लागणार आहे. त्यानंतर विधानसभानिहाय ४३१ मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ) सुनावणी घेतील. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.
येथे शोधा तुमचे नाव
नागपूर ः मतदार याद्याच्या शुद्धीकरणासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिम राबविण्यात आली असून ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून आयोगाने दिलेल्या वेबसाईटवर बघता येणार आहे. ceo.maharashtra.gov.in, voters.eci.gov.in यावर मतदारांना आपले नाव शोधता येईल. त्याच प्रमाणे तुमच्या भागातील बीएलओकडे यादी असेल. त्यांच्याकडूनही याची माहिती घेता येईल.
