नागपूर : भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम सुरू केली केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कोट्यवधी मतदारांची नावे कमी झाली आहे. ही मोहीम सत्ताधाऱ्यांच्या फायद्याची असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे. आता महाराष्ट्रात ही मोहीम सुरू करण्यात आली असून ती पूर्ण व्हायची आहे. परंतु आताच नागपूर जिल्ह्यातील जवळपास ६ लाख मतदारांची नावे कमी होणार असल्याचे स्पष्ट आहे. या आकड्यात वाढ होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.
इतर राज्यात यापूर्वी राबवण्यात आलेल्या एसआयआर मोहिमेत लाखो मतदारांची नावे वगळ्यात आली होती व त्यामुळे या मोहिमेवर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली होती. आता महाराष्ट्रात ही मोहीम ३० जूनपासून सुरू करण्यात आली असून १७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या मोहिमेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. एसआयआर अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन त्यांना मतदार नोंदणी अर्ज देऊन तो भरून घ्यायचा आहे.
संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ४६,३८,५८९ मतदार असून ४२ लाख ७२३ मतदारांपर्यंत बीएलओ पोहोचले असून त्यांना अर्ज देण्यात आले. तर २९,०७, ८८९ मतदारांकडून घेण्यात आलेल्या अर्जाचे संगणकीकरण (डिजिटलाइझेशन) करण्यात आले. ही प्रक्रिया अद्याप पूर्ण व्हायची असली तरी ५,९५, १३४ मतदारांची नावे यादीतून कमी होणार आहे. प्रशासनातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वगळण्यात येणारी नावे ही मृत किंवा दुबार मतदारांशी संबंधित आहे. अद्यापही जवळपास सव्वाचार लाख मतदारांच्या घरापर्यंत बीएलओ पोहोचले नाहीत. त्यामुळे नाव कमी होणाऱ्या मतदारांच्या आकड्यात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येते.
असा आहे कार्यक्रम…
घरभेटीद्वारे मतदार पडताळणी : १७ ऑगस्टपर्यंत
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : २४ ऑगस्ट
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर
दावे-हरकतींवर सुनावणी : २४ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : २७ ऑक्टोबर २०२६
‘एकही घर भेटीविना सुटता कामा नये’
अनेक मतदारांनी आपले अर्ज भरताना अर्धवट पत्ते दिल्यामुळे अडचणी निदर्शनास येत आहेत. यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने स्थानिक नगरसेवकांनी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ‘बीएलओं’ना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह बीएलओ, पर्यवेक्षकांची बैठक घेतली. मतदारांचे अर्ज भरून घेताना स्थानांतर, दुबार, मृत अशी संख्या निदर्शनास येत आहे. याची खातरजमा ही गृहभेटीतूनच होऊ शकते. ‘बीएलओं’कडून त्यांना दिलेल्या भागांतील एकही घर भेटीविना सुटता कामा नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी ‘बीएलए’ची नियुक्ती करून सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
