नागपूर : नागपूर-वर्धा रेल्वे मार्गावरील सेवाग्राम ते सेलू रोडदरम्यान उभारण्यात आलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. नव्या मार्गाची सुरक्षितता आणि क्षमतेची पडताळणी करण्यासाठी शनिवारी १३० किमी प्रतितास वेगाने विशेष रेल्वे धाववून चाचणी घेण्यात येणार आहे.

अतिवर्दळीच्या मार्गावरील ताण होणार कमी

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर-वर्धा हा अतिशय व्यस्त रेल्वे मार्ग आहे. या मार्गावरून मुंबई, चेन्नई तसेच दक्षिण भारताकडे जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रवासी रेल्वे धावतात. याशिवाय मोठ्या प्रमाणावर मालवाहतूकही याच मार्गावरून केली जाते.

विद्यमान दोन रेल्वेमार्गांवर वाढता वाहतूक ताण लक्षात घेऊन तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सेवाग्राम-सेलू रोडदरम्यानचा हा टप्पा पूर्ण झाल्याने या महत्त्वपूर्ण प्रकल्पातील आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून होणार तपासणी

नवीन मार्गावर रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांच्याकडून वैधानिक तपासणी करण्यात येणार आहे. या वेळी मोटर ट्रॉलीद्वारे संपूर्ण मार्गाची पाहणी केली जाईल. रेल्वे रुळांची स्थिती, पूल, समपातळी फाटक, सिग्नल व्यवस्था आणि इतर तांत्रिक सुविधांची तपासणी करण्यात येणार आहे.

तपासणीनंतर नव्या मार्गाची कार्यक्षमता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी १३० किलोमीटर प्रतितास वेगाने विशेष चाचणी रेल्वे धाववण्यात येईल. या चाचणीनंतर मार्गावरील वेगमर्यादा आणि परिचालनासंबंधी निर्णय घेतले जाणार आहेत.

नागरिकांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन

स्पीड ट्रायलच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने नागरिकांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. चाचणी रेल्वे वेगाने धावणार असल्याने नागरिकांनी रेल्वे रुळांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे सांगण्यात आले आहे. रुळांजवळ जाणे, रेल्वे रुळ ओलांडणे, तसेच चाचणी रेल्वेचे छायाचित्रण किंवा चित्रीकरण करण्यासाठी धोकादायक ठिकाणी थांबणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रस्ता ओलांडण्यासाठी केवळ अधिकृत रेल्वे फाटक, रोड ओव्हर ब्रिज किंवा रोड अंडर ब्रिजचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवासी आणि मालवाहतुकीला मिळणार वेग

तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नागपूर-वर्धा मार्गावरील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढणार आहे. प्रवासी आणि मालगाड्यांचे स्वतंत्र नियोजन करणे अधिक सुलभ होणार असून गाड्यांचा विलंब कमी होण्यास मदत होईल. नव्या मार्गामुळे वेळापत्रक अधिक प्रभावीपणे राबविता येणार असून परिचालन क्षमता वाढेल. प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि वेळेवर सेवा देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.