पावसाळ्यात फक्त राजधानी मुंबईच तुंबते असे नाही, तर अलीकडच्या काही वर्षात उपराजधानीची वाटचाल देखील त्याच दिशेने सुरू झाली आहे. तास-दोन तासांच्या पावसानेच नागपूरकरांची तारांबळ उडते. गुरुवारी दुपारी एक-दीड वाजताच्या सुमारास कोसळलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहर जलमय झाले.

तासाभराचा मूसळधार पाऊसही आता नागपूरकरांसाठी डोके दुखी ठरु लागला आहे. शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे फक्त चित्र निर्माण केले जात आहे. प्रत्यक्षात शहरातील समस्या एकापाठोपाठ एक वाढतच चालल्या आहे. शहरातील अनेक रस्ते आता सिमेंटच होत असताना पावसाळी पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था मात्र जशीच्या तशीच आहे. तासभर पाऊस कोसळला तरी नाल्या तुंबतात आणि रस्त्यांना तलावाचे स्वरुप येते. 

गुरुवारी दुपारी एक-दीड वाजताच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी भरुन आले आणि ढगांच्या गडगडाटाने पावसाच्या आगमनाची वर्दी दिली. त्याचवेळी वीजांचा कडकडाट होऊन मूसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तास-दीड तास पावसाने रौद्र रुप धारण केले होते. मात्र, त्याचा सर्वात मोठा फटका शहरातील नागरिकांना बसला. शहरातील अनेक वस्त्या जलमय झाल्या, तर रस्ते तलावांमध्ये परावर्तीत झालेले दिसून आले. शहरातील नरेंद्रनगर पुलाखाली पूरसदृष्य पाणी वाहत असल्यामुळे अनेक वाहनचालक या पाण्यात अडकले. तर अलीकडेच झालेल्या मनिषनगर भूयारीमार्गतही पाणी साचले. सिमेंट रस्त्याच्या चुकीच्या नियोजनाचा फटका नेहमीप्रमाणे या रस्त्यालगतच्या घरांना बसला. रस्ते उंच आणि घरे खाली झाल्यामुळे अनेक घरांच्या अंगणात पाणी शिरले.

अलीकडच्या काही वर्षात भविष्यातील ‘लंडन स्ट्रीट’ला लागून असलेल्या सहकारनगराचा मार्गच साचलेल्या पाण्यामुळे बंद झाला. तर या संपूर्ण वस्तीत पाणी साचले. निकालस सोमलवार शाळेजवळही एक ते दोन फु टाच्या जवळपास पाणी साचले होते. गोपालनगर परिसरातही हीच स्थिती होती. शहरातील जवळपास सर्वच परिसरात एक ते दोन फुटापर्यंत पाणी साचले होते. कोट्यावधी रुपयाची कामे केल्याची बजावणी नगरसेवक करतात, पण ऐन निवडणूकीच्या तोंडावर पावसाने पोलखोल केली आहे. गेल्या काही वर्षांपासून हीच स्थिती असून महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.