Nagpur Water Crisis: एखाद्या गोष्टीचा सोयीनुसार अर्थ लावणे किंवा एखाद्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, हे आपल्याकडे काही नवे नाही. विशेषतः प्रशासन याच पद्धतीने चालते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. राज्य सरकारने पाणीकपातीबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपातीचे निर्देश दिले आहेत. परंतु नागपूर महापालिकेने सर्वप्रथम उपाययोजनांवर बैठक घेतली. त्यानंतर नागरिकांना बचतीच्या आवाहनावर भर दिला. याच काळात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आली. पदवीधरचे मतदार शहरात मोठ्या संख्येने आहेत. निवडणुकीत नागरिकांची गैरसोय झाल्यास त्याचे विपरीत परिणाम निकालावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाणीबचतीचा विषय महापालिकेने काही वेळ बाजूला ठेवल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर शनिवारी बैठक घेऊन पाण्याचा वापर मोटार स्वच्छतेसाठी (वॉशिंग सेंटर) तसेच जलतरण तलावासाठी (स्विमिंग पूल) करणाऱ्या संचालकांकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे निर्देश देत उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे मतदान संपताच पाणीबचत आठवल्याची चर्चा रंगली आहे.
महापालिकेच्या संवेदनशीलतेचा मुखवटा उघड!
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात किमान १० टक्के कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु या निर्देशांची अंमलबजावणी नागपूर महापालिकेने केली नाही. केवळ बैठकांची औपचारिकता पूर्ण केली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये केवळ ५८ टक्के साठा उपलब्ध आहे. दिवसेंदिवस त्यात घट होत असल्याचे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची गरज नाही. परंतु भविष्याचे संकट लक्षात घेऊन निर्णय घेण्याऐवजी मतदान होईस्तोवर केवळ चर्चेचे गुऱ्हाळच सुरू ठेवले. दुसरीकडे, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह जलाशयाच्या पाणीसाठ्यात मागील ११ ते १७ ऑक्टोबर या आठवडाभरात ४०, तर नवेगाव खैरी जलाशयाच्या पाणीसाठ्यात ८.६४ दलघमी घट झाली. या आठवडाभरात शहराला यातील फक्त ३ ते ४ दलघमी पाण्याचाच पुरवठा झाला असून, ३६ दलघमी पाणी कुठे गेले, असा प्रश्न कायम आहे. अर्थात, गळती, चोरी किंवा बाष्पीभवनातून हे पाणी गायब झाले. यावर नियंत्रणासाठी अद्यापही महापालिकेकडून कुठलीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या पाणीबचतीचा बुरखा फाटल्याचे चित्र आहे.
दंडात्मक कारवाईने पाणीबचत शक्य?
मतदान झाल्यानंतर महापालिकेने वाहन वॉशिंग सेंटर व जलतरण तलावांवर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी पिण्याच्या पाण्याचा वापर मोटार स्वच्छतेसाठी (वॉशिंग सेंटर) तसेच जलतरण तलावांसाठी करणाऱ्या संचालकांकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे निर्देश देत उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली. पिण्याच्या पाण्याचा होणारा अपव्यय तत्काळ थांबवण्यासाठी शहरातील सर्व वाहन स्वच्छता केंद्रे आणि जलतरण तलावांची सखोल तपासणी करावी. रस्ते स्वच्छता, बागकाम आणि बांधकामाच्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करताना आढळल्यासही पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे निर्देश आयुक्तांनी बैठकीत दिले. आता या दंडात्मक कारवाईचा परिणाम पाणीबचतीवर होतो की हे सर्व लोक दंड भरून पाण्याचा अपव्यय कायम ठेवणार, हे येणारा काळच सांगेल. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर तसेच रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य ठेवणाऱ्यांवर आणि बांधकामाचा मलबा रस्त्यांवर ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई दररोज केली जात आहे. दररोज दंडही वसूल केला जात आहे. यातूनच नागरिक केवळ दंड भरायला तयार आहेत, हे स्पष्ट होते. त्यामुळे पाणीबचतीसाठी दंडात्मक कारवाईचे शस्त्र किती उपयोगी पडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
३५ टक्के पाणीगळतीचे काय?
नागपूर शहराच्या ३२ लाख लोकांसाठी पेंच जलाशय आणि कन्हान नदीतून दररोज साधारण ७४० ते ७७० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. यातील सुमारे २५९ एमएलडी (३५ टक्के) पाणी गळती, अनधिकृत नळजोडणी (पाणीचोरी) आणि विनाबिल पुरवठ्यामुळे वाया जाते किंवा त्याचा हिशेब महसुलात येत नाही. ३५ टक्के पाण्याबाबत महापालिकेला अद्यापही फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. आता दुष्काळाचे संकट आल्यानंतर बेकायदेशीर जोडण्यांद्वारे पाणी घेणाऱ्यांविरुद्ध कठोर मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. महापालिकेची कठोर मोहीम म्हणजे जोडणी बेकायदेशीरवरून कायदेशीर करून घेण्याची संधी देण्यात येणार आहे. अवैध नळजोडणीच्या ठिकाणी मीटर बसवणे आणि मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या किंवा तो काढून टाकणाऱ्या ग्राहकांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. मग आतापर्यंत ज्यांनी पाणीचोरी केली, त्याचे काय? पाणीचोरी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून प्रामाणिकपणे पाण्याचे कर भरणाऱ्यांवरील हा अन्याय महापालिकेला आतापर्यंत का दिसला नाही? तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा हा प्रकार महापालिकेच्या गांभीर्याचा बुरखा फाडणारा ठरत आहे.
गायब पाण्याबाबत बेफिकिरीचा कळस?
आठवडाभरात ३६.३६ दलघमी पाणी, अर्थात ३६,३६० एमएलडी पाणी कुठे जाते, त्याचा पत्ता नाही. विशेष म्हणजे, ७४० एमएलडी प्रतिदिन एवढे पाणी शहराला ४९ दिवस पुरविता आले असते. या पाण्याचा हिशेब कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शहराला दररोज सुमारे ७४० दशलक्ष लिटर (एमएलडी) शुद्ध केलेले पाणी मिळते. यापैकी ५२० एमएलडी पाणी तोतलाडोह जलाशयातून येते, तर २२० एमएलडी पाणी कन्हान नदीतून शहराला मिळते. तोतलाडोह जलाशयात ११ ऑक्टोबरला ४८० दलघमी पाणीसाठा होता. तो १७ ऑक्टोबरला ४४० दलघमीपर्यंत खाली आला आहे. अर्थात, आठवडाभरात ४० दलघमी घट झाली. शहराला दररोज ५२० एमएलडीनुसार तोतलाडोह जलाशयातून दररोज ०.५२ दलघमी पाणी, अर्थात आठवडाभरात ३.६४ दलघमी पाणी शहराला मिळाले. त्यामुळे आठवडाभरातील ३६.३६ दलघमी पाणी कुठे झिरपले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता महापालिकेचे ‘विहिरींकडे चला’ अभियान?
महापालिकेने पाण्यासाठी आता विहिरींकडे अभियान सुरू केल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शहरातील सर्व ८६० विहिरींवर लक्ष केंद्रित केले आहे. यापैकी पाणी नसलेल्या किंवा पाण्याची कमतरता असलेल्या ४०० विहिरींमध्ये बोअर करण्यात येणार आहे. याशिवाय सर्वच विहिरींच्या स्वच्छतेसाठी निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. सुरुवातीला केवळ २०० विहिरींमध्ये बोअर करण्याचे ठरवले होते. परंतु दुष्काळाचे संकट अंगावर आल्याने यात आणखी २०० विहिरींचा समावेश करण्यात आला आहे. विहिरींतून लघुनळ योजना तयार करण्याचेही नियोजन आहे. विहिरींतून संबंधित भागात घरातील बाग, भांडी धुणे आदींसाठी या पाण्याचा वापर करता येणार आहे. विहिरींतील पाण्याचा बाग, भांडी धुणे आदींसाठी वापर केला जाऊ शकतो, तर वर्षभर विहिरी स्वच्छ आणि खोल का केल्या जात नाहीत? यातूनही पाण्याची वर्षभर बचत शक्य आहे. परंतु महापालिकेत दुर्दैवाने दूरदृष्टी असलेले अधिकारी व पदाधिकारी दोन्ही नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे संकट आल्यानंतरच जागे होण्याची परंपरा कायम असल्याची शेरेबाजीही नागरिक करीत आहेत.
निवडणूक काळात सुरळीत पाणीपुरवठा, आपत्कालीन कामेही नाहीत
पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत जलवाहिनी जोडण्याच्या कामासाठी ६ ऑक्टोबरला नियोजित ३६ तास पाणीपुरवठा बंद करण्यात आला. परंतु कामे लांबल्याने जवळपास ६० तासांनंतर ९ ऑक्टोबरला पाणी सुरू झाले. त्यानंतर १३ ऑक्टोबरला अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा महापालिका व ओसीडब्ल्यूने केली. त्यामुळे नागरिकांचा संताप वाढला होता. परंतु पदवीधरच्या निवडणूक काळात एकही आपत्कालीन पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होता. केवळ निवडणुकीपुरतेच महापालिका व पदाधिकाऱ्यांचे नागरिकांवर प्रेम होते काय, असा प्रश्नही आता चर्चेत आहे.
