नागपूर: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ठप्प असलेली प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू झाली आहे. प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांची निवड यादी, प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. पालकांना प्रवेशासाठीचे लघुसंदेश सोमवारपासून पाठवले जात आहेत. लघुसंदेश मिळालेल्या पालकांना २३ ते ३१ जुलै या कालावधीत पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्र पडताळणी करून पाल्याचा प्रवेश निश्चित करता येईल.
नागपूर जिल्ह्यातील ६५५ शाळांमधील ६ हजार ६४८ जागांवर प्रवेश होणार आहेत. नागपूरच्या राज गुरुकूल स्कूल स्नेहनगर, हसनबाग येथील शाळेत काही पालकांनी अर्ज केला. तीन किलोमीटरच्या आत शाळा असल्याने या शाळेमध्ये प्रवेश मिळणे शक्य झाले. शाळेत प्रवेशाचा लघुसंदेश आल्यावर पालक शाळा पाहायला गेले असता त्यांना तेथे भलतेच चित्र दिसले. शाळेचा पत्ता असलेल्या जागेवर केवळ एक गोठा होता. एक गाय येथे बांधलेली तेथे दिसली. त्यामुळे पालकांना मोठा धक्का बसला. त्यानंतर पालकांनी याबद्दल सविस्तर माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता शाळा सहा वर्षांपासून या ठिकाणावरून दुसरीकडे गेली आहे. असे असतानाही जुनाच पत्ता असल्याने पालकांचा गोंधळ उडाला आहे.
हेही वाचा – Video : चालकाला आततायीपणा नडला, पुरात ट्रॅक्टर वाहून गेला; थरारक व्हिडीओ एकदा पाहाच…
वंचित घटक, सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर खासगी शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. यंदा शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशांच्या नियमांत बदल केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. परिणामी न्यायालयात याचिका दाखल होऊन प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे जुलै महिना अर्धा होऊनही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशात केलेले बदल घटनाबाह्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात १ लाख ५ हजार २२३ रिक्त जागांसाठी एकूण २ लाख ४२ हजार ५१६ अर्ज दाखल झाले. त्यातील ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. तर ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा प्रतीक्षा यादीत समावेश आहे. तर नागपूर जिल्ह्यातील ६५५ शाळांमधील ६ हजार ६४८ जागांवर प्रवेश होणार आहेत.
फसवणूक झाल्यास हे उपाय करा
- जिल्ह्यातील ६५५ शाळांमधील ६ हजार ६४८ जागांवर प्रवेश होणार.
- सोमवार २२ जुलैपासून पालकांच्या नोंदणी भ्रमनध्वनीवर संदेश येणार.
- संदेशावर अवलंबून न राहता आरटीई संकेतस्थळावर जाऊन प्रवेश तपासावा.
- २३ ते ३१ जुलैपर्यंत तालुका पडताळणीसमितीकडे कागदपत्रांची पडताळणी करावी.
- फसवणूक झाल्यास पडताळणी समितीकडे जाऊन अडचण सांगा.
- बनावट कागदपत्रे सादर करू नये.
- प्रवेशासाठी कुणाच्याही प्रलोभनांना बळी पडू नये.
© The Indian Express (P) Ltd