नागपूर : पशुपतिनाथाच्या दर्शनासाठी नेपाळला गेलेल्या नागपूरच्या निर्मला पांडे यांची काठमांडूत प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती नाजूक असल्याने त्यांना हवाई रुग्णवाहिकेने नागपुरात आणण्यासाठी मदत करावी, अशी विनंती कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

नागपुरातून १०६ पर्यटकांचा समूह नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेला होता. दर्शनानंतर बहुतांश पर्यटकांचा परतीचा प्रवास सुरू झाला; मात्र याच समूहातील वृद्ध पर्यटक निर्मला पांडे यांची काठमांडूत अचानक प्रकृती बिघडली. त्यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती नाजूक असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. आता त्यांना नागपुरात आणण्यासाठी कुटुंबीयांनी महाराष्ट्र सरकारकडे मदत मागितली आहे.

नेपाळमध्ये नेमके काय घडले?

निर्मला पांडे या पशुपतिनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेलेल्या १०६ नागपूरकर पर्यटकांमध्ये होत्या. काठमांडूत त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना शहीद गंगालाल नॅशनल हार्ट सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तातडीच्या उपचारांत अडचण का?

पांडे यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्याची गरज असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी खूप वाढल्याने सध्या अँजिओप्लास्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

काठमांडूत त्यांच्यासोबत कोण आहे?

इतर पर्यटकांनी परतीचा प्रवास सुरू केला असला तरी निर्मला पांडे यांचा नातू आदित्य पांडे त्यांच्यासोबत काठमांडूत थांबला आहे.

बाकीचे नागपूरकर कुठे आहेत?

१०६ पर्यटकांपैकी चार जण दिल्लीमार्गे नागपूरला विमानाने परतले आहेत, तर सुमारे १०० पर्यटक पाटणा-नांदेड एक्स्प्रेसने नागपूरकडे रवाना झाले आहेत.

फडणवीस, गडकरींकडे कुटुंबीयांची काय मागणी?

निर्मला पांडे यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना हवाई रुग्णवाहिकेने नेपाळमधून नागपुरात आणण्यासाठी तातडीने मदत करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. नागपुरात आणल्यानंतर त्यांच्यावर आवश्यक उपचार करता यावेत, यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी कुटुंबीयांची विनंती आहे. त्यामुळे या प्रकरणात केंद्र व राज्य शासनाकडून कुटुंबियांना कोणती मदत मिळणार ? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.