नागपूर : खोदकाम केल्यानंतर निष्काळजीपणा दाखवत वीज तारा उघड्या ठेवणे किती घातक ठरू शकते, हे ताजबागेत घडलेल्या एका घटनेवरून समोर येत आहे. एका उघड्या वीजतारेने ६० वर्षीय महिलेला असाच हकनाक जीव गमवावा लागला. या घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे तिचा मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावरच पडून राहिला. त्या काळात मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. ताजबाग परिसरातील गौसिया कॉलनीत घडलेल्या या घटनेने केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणाचाच नव्हे, तर समाजातील वाढत्या असंवेदनशीलतेचाही प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

सिवर लाईन शेजारी भुमिगत वीज तार उघड्या…

मृत महिला अफरोज अजीम खान (६०, रा. सक्करदरा) या बीसा बाबा दर्गा परिसरातून जात असताना रस्त्यालगत असलेल्या स्ट्रीट लाईटच्या उघड्या वीजवाहिनीच्या संपर्कात आल्या. विजेचा तीव्र धक्का बसताच त्या जागीच कोसळल्या. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सीवर लाईनच्या कामादरम्यान स्ट्रीट लाईटची भूमिगत वीज केबल खराब झाली होती. त्यानंतर ती वेळेत दुरुस्त करण्यात आली नसल्याने त्या भागात वीजप्रवाह सुरूच होता. याच निष्काळजीपणाची किंमत अफरोज खान यांना जीव गमावून चुकवावी लागली.

मदतीसाठी कोणीही आले नाही

घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांना आणि संबंधित यंत्रणांना माहिती दिली. मात्र, मदत पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे मृत महिलेचा देह जवळपास दोन तास रस्त्यावरच पडून राहिला. अनेकजण त्या मार्गाने ये-जा करत होते, पण मदतीसाठी किंवा मृतदेह झाकण्यासाठीही कोणी पुढे न आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी

स्थानिकांच्या मते, जर वीजवाहिनीची वेळेत दुरुस्ती झाली असती, तर हा जीव वाचू शकला असता. त्यांनी महापालिका आणि संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप करत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही वेळेने सक्करदरा पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या निष्काळजीपणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

एका मृत्यूने अनेक प्रश्न उभे…

अफरोज खान यांचा मृत्यू हा केवळ विजेच्या धक्क्याने झालेला अपघात नाही तर तो प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि समाजातील कमी होत चाललेल्या संवेदनशीलतेचा आरसाही आहे. उघड्या वीजवाहिन्या किती दिवस जीवघेणा सापळा बनून राहणार? आणि एखादा माणूस रस्त्यावर निपचित पडलेला असताना मदतीचा हात पुढे करण्याची माणुसकी आपण कधी दाखवणार? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनासह समाजालाही द्यावी लागणार आहेत..